मुंबई – साऊथचा मेगास्टार चिरंजीवीचा ‘गॉडफादर’ हा चित्रपट सुरुवातीपासूनच चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटात बॉलिवूडचा भाईजान सलमान खान या चित्रपटात चिरंजीवीसोबत दिसणार असल्यामुळे सर्वांनाच या चित्रपटाची खूप उत्सुकता आहे. मात्र सध्या या चित्रपटासमोर मोठी अडचण निर्माण झाल्याचे समजते.
पुढील महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. त्यानुषंगाने चित्रपटाचा टिझर देखील प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र आता चित्रपटाची रिलीजची तारिख जवळ असताना चित्रपटाला अद्याप वितरक मिळत नसल्याचे वृत्त समोर आलं आहे.निर्मात्यांनी चित्रपटाच्या थिएटरच्या हक्कांसाठी 85 कोटींची किंमत निश्चित केली आहे, परंतु आतापर्यंत कोणीही त्यांचा चित्रपट विकत घेण्यास स्वारस्य दाखवले नाही. त्यामुळे चित्रपटाची तारीख पुढे ढकलली जाणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.
चिरंजीवीचा याआधीचा ‘आचार्य’ हा चित्रपट चांगलाच आपटला होता. म्हणूनच या चित्रपटाचे वितरण स्वीकारण्यासाठी वितरक तयार होत नसल्याचे बोलले जात आहे. परंतु मेगास्टार चिरंजीवीच्या चित्रपटावर अशी वेळही येऊ शकते यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीए. तुफान ऍक्शन असलेल्या गॉडफादर केव्हा प्रदर्शित होणार याकडे मात्र चाहत्यांचा लक्ष लागून आहे.