चिराग पासवान यांचा प्रथमच भाजपवर निशाणा; म्हणाले…

नवी दिल्ली – पक्षांतर्गत गृहकलहाला सामोरे जात असलेले लोक जनशक्ती पक्षाचे (लोजप) नेते चिराग पासवान यांनी प्रथमच भाजपवर निशाणा साधला आहे. लोजपपुढे उद्भवलेल्या पेचप्रसंगावेळी भाजपने बाळगलेले मौन व्यथित करणारे आहे. त्या पक्षाबरोबरचे संबंध एकतर्फी असू शकत नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा घटक असणारा लोजप बिहार विधानसभा निवडणुकीआधी त्या आघाडीतून बाहेर पडला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूला लक्ष्य करत त्या पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत चिराग यांनी जेडीयू आणि नितीश यांच्याविरोधात आक्रमक प्रचार केला. मात्र, भाजपविषयी सहानुभूतीची भूमिका घेतली.

आता मागील काही दिवसांपासून चिराग आणि त्यांचे काका पशुपतीकुमार पारस यांच्यात लोजपच्या ताब्यावरून संघर्ष सुरू झाला आहे. लोजपमधील फाटाफुटीला जेडीयू जबाबदार असल्याचा आरोप चिराग गटाकडून केला जात आहे. त्या पेचात आतापर्यंत चिराग यांनी भाजपविषयी नरमाईच बाळगली होती. मात्र, मंगळवारी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत चिराग यांनी एकप्रकारे भाजपलाही धारेवर धरले.

माझे वडील दिवंगत रामविलास पासवान आणि मी नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या पाठिशी उभे राहिलो. मात्र, आमच्या अवघड काळात भाजप आमच्या बाजूने उभा राहिल्याचे दिसत नाही. माझा मोदींवरील विश्‍वास कायम आहे. पण, आमची कोंडी केली जात असेल तर आम्हाला सर्व शक्‍यतांचा विचार करावा लागेल.

कोण बरोबर राहिले आणि कोण नाही याचा विचार करून आम्हाला राजकीय भवितव्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे ते म्हणाले. आम्ही एनडीएचा घटक आहोत की नाही याविषयीचा निर्णय भाजपने घ्यायचा आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.