नवी दिल्ली- केंद्रीय मंत्री आणि दिग्गज राजकीय नेते रामविलास पासवान यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांच्या लोकजनशक्ती या पक्षाची तसेच कुटुंबाची जबाबदारी त्यांचे खासदार पुत्र चिराग पासवान यांच्या खांद्यावर आली आहे. बॉलिवूड ते संसद असा प्रवास करणारे चिराग गेल्या काही दिवसांत बिहार विधानसभा निवडणुकीमुळे प्रकाशझोतात आले आहेत. त्यामुळे त्यांच्या संदर्भात सगळ्याच माहितीला जोरदार प्रसिध्दीही मिळत आहे.
आता चिराग यांची मालमत्ता किती याबाबतचा तपशील प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यांनी 2014 मध्ये प्रथम बिहारच्या जमुई मतदारसंघातून विजय मिळवत लोकसभा गाठली होती. 2019 मध्येही ते याच मतदार संघातून पुन्हा विजयी झाले आहेत. त्यावेळी त्यांनी जे प्रतिज्ञापत्र दाखल केले होते, त्यावरून त्यांच्या मालमत्तेचा तपशील उघड झाला आहे.
उपलब्ध माहितीनुसार चिराग यांची 1.84 कोटींची मालमत्ता आहे. त्यात पाटण्यातील 90 लाखांच्या बंगल्याचाही समावेश आहे. त्यांच्याकडे एक जिप्सी आणि फॉर्च्युनर अशा दोन गाड्या आहेत. सगळ्यांत महत्वाचे म्हणजे ते सहा कंपन्यांचे मालक आहेत. त्या कंपन्यांचा तपशील मात्र देण्यात आलेला नाही.
राजकारणात आज प्रस्थापित झाले असले तरी चिराग यांचा राजकारणापेक्षा अभिनयाकडे विशेष ओढा होता.
लहानपणापासून त्यांनी आपल्या या आवडीच्या क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले होते. त्यानंतर 2011 मध्ये मिले ना मिले हम या चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता.
कॉम्प्युटर सायन्समधून बीटेक झालेल्या चिराग यांच्या पहिल्या चित्रपटाला म्हणावे तसे यश मिळाले नाही. याच सुमारास त्यांचे वडिल रामविलास पासवान यांच्या प्रकृतीच्या कुरबुरीही सुरू झाल्या. तेव्हा त्यांच्यासोबत राजकरणात काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
आता सलग दोनदा लोकसभेवर ते निवडून आले आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांची व त्यांच्या पक्षाची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
लोकजनशक्ती पक्ष राज्यात किंगमेकरच्या भूमिकेतही जाउ शकतो असा दावा केला जातो आहे.