पंतप्रधान नितीश यांच्या दबावाखाली; चिराग पासवान यांचा दावा

 

पाटणा – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या दबावात आहेत. त्यामुळेच ते बिहारमध्ये 12 प्रचार सभा घेणार असल्याचा दावा लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी केला आहे.

बिहारमधील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडल्यानंतर चिराग सातत्याने नितीश आणि त्यांच्या पक्षावर टीका करत आहेत. मात्र, त्यांनी भाजपवर टीका केलेली नाही. उलट आपण भाजपला सरकार बनविण्यासाठी पाठिंबाच देऊ, असेही त्यांनी जाहीर केल्यावर भाजपने चिराग यांना फटकारले होते. मात्र, आता त्यांनी एका मुलाखतीत पंतप्रधानच नितीश यांच्या दबावात असल्याचा दावा केला आहे.

तसेच बिहारमधील आगामी सरकार हे भाजप आणि त्यांच्या पक्षाचेच असेल याचा पुनरुच्चारही त्यांनी केला आहे. मात्र, जर पुन्हा नितीश यांचे सरकार आले तर आपण राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, चिराग पासवान यांनी कोणत्याही भ्रमात राहू नये. आम्ही संयुक्त जनता दलासोबत निवडणूक लढत आहोत व पुढचे सरकारही नितीश यांच्या नेतृत्वाखालीच असेल असे भाजपचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र यादव यांनी स्पष्ट केले आहे. चिराग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मते मागू नयेत, असेही त्यांना पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, भाजप जाहीरपणे काहीही म्हणत असली तरी चिराग यांना त्याच पक्षाची फूस असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.