56 केंद्रांत करोनाची घुसखोरी; पुण्याची रिकव्हरी 100 टक्के
पुणे -“चिनी व्हायरस’ करोना विषाणूनेही देशातील लष्करी केंद्रांमध्येही घुसखोरी केली आहे. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या अखत्यारित असलेल्या 56 लष्करी केंद्रांमध्ये आतापर्यंत 400 अधिकारी-जवान करोनाबाधित झाले. मात्र, गौरवाची बाब म्हणजे सैन्याने या “आरोग्य शत्रू’लाही चोखपणे उत्तर देत विजयी परंपरा कायम राखली आहे. यात पुण्याचा रिकव्हरी रेट 100 टक्के आहे.
देशावर आलेल्या कोणत्याही संकटांचा सामना करण्यासाठी सैन्यदल कायम सज्ज असते. करोनाचा सामना करण्यासाठीही सर्वप्रथम सैन्यदलाने पुढाकार घेत, मानेसर येथे विशेष केंद्राची उभारणी केली. इतकेच नव्हे, तर देशात अनेक ठिकाणी लष्करी वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून करोना प्रतिबंधासंदर्भात प्रशिक्षण आणि सुविधेची उभारणी केली आहे. मात्र, करोना संसर्गाने देशातील लष्करी तळांमध्येही शिरकाव केला असून, अनेक ठिकाणी सैन्य अधिकारी आणि जवान करोनाबाधित झाल्याचे समोर आले. यात पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, औंध मिलिटरी स्टेशन, पुणे कॅन्टोन्मेंटमधील लष्करी युनिट येथेही प्रशिक्षणार्थी, अधिकारी, जवान यांना करोना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.
याबाबत दक्षिण मुख्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, “मुख्यालयाच्या अखत्यारित येणाऱ्या 11 राज्यांतील 56 लष्करी केंद्रांमध्ये आतापर्यंत 400 लष्करी अधिकारी, जवान करोनाबाधित झाले. तर, पुण्यात हा आकडा दोन अंकी आहे. मात्र, बाधित बरे होण्याचे प्रमाण अधिक असून विशेषत: पुण्यातील लष्करी तळांमधील रिकव्हरी रेट 100 टक्के आहे.’
लष्कराकडून घेतली जाणारी काळजी
– सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन
– परिसरात नियमित केले जाणारे सॅनिटायझेशन
– वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या प्रतिबंधात्मक सूचना
– रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून गरजेच्या वस्तूंची होम डिलिव्हरी