राजवाड्याला चायनीजच्या खरकट्याचा विळखा

राजवाडा परिसरातील चौपाटी म्हणजे खवैय्यासाठी पर्वणीच असते पण या परिसरात सार्वजनिक स्वच्छतेच्या नियमांना फाटा देण्यात आल्याने राजवाडा परिसर चायनीज कचऱ्याची कचरा कुंडी झाली आहे. चिकनचे तुकडे, त्याचे खरकटे पाणी, शिल्लक राहिलेले जिन्नस, अजिनोमोटोच्या सॉसच्या बाटल्या इत्यादी साहित्य एका ठिकाणी गोळा करून ते सोनगाव कचरा डेपोत पाठवण्यासाठी घंटागाडीची व्यवस्था करण्यात आली आहे.

मात्र काही विक्रेत्यांनी चौपाटीवर कोठेही खरकटे टाकून देण्याचा उद्योग सुरू केला आहे. शुक्रवारी रात्री प्रतापसिंह उद्यानाच्या दारात चायनीज राईस आणि चिकनचे तुकडे फेकून दिल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी निर्माण झाली होती. आरोग्य विभागाच्यावतीने तातडीने रस्ता धुण्यात आला. मात्र हेच खरकटे कधी राजवाडा परिसराच्या अंर्तगत बोळात, कधी गोलबागेच्या कोपऱ्यावर तर कधी जुन्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या पिछाडीला ओढ्यात टाकून दिले जाते. ऐतिहासिक राजवाडा परिसराचे या चायनीज कचऱ्यामुळे वाढले असून येथे भटक्‍या कुत्र्यांची संख्यासुद्धा वाढली आहे.

स्वच्छ सुंदर साताऱ्याचा डांगोरा पिटणारा आरोग्य विभाग शहराचे सार्वजनिक आरोग्य मात्र धोक्‍यात आणत आहे. चायनीज विक्रेत्यांना ऐतिहासिक परिसराचे बकालीकरण करणेबाबत कठोर दंड करण्याची आरोग्य विभागाची मानसिकता नाही. मात्र प्रत्येक टपरी मागे किती कमिशन कसे लाटायचे याचे अंदाज मात्र लगेच तयार असतात. साताऱ्यात व्यवसाय करायला ना नाही पण सार्वजनिक स्वच्छतेचे नियम पाळायलाच हवेत हा दंडक आरोग्य विभागच विसरला असून थेट नियंत्रणाअभावी काही चायनीज विक्रेते सोकावल्याची चर्चा आहे. या चौपाटीच्या अर्थकारणामुळे काही धेंडांच्या वरदहस्ताने ऐतिहासिक राजवाडा परिसराची वाट लावण्याचे उद्योग सुरू आहेत. त्यामुळे राजवाडा परिसरातून ही चौपाटी तातडीने हलवावी अशी मागणी पर्यावरणप्रेमी सातारकरांमधून होऊ लागली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.