Chinese Nylon Manja : नाशिकमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशीच मांजाने एका दुचाकी स्वाराचा गळा चिरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात राहणारा 23 वर्षीय सोनू किसन धोत्रे गुजरात मधील महापालिकेत चालकाची नोकरी करत होता. संक्रांती निमित्ताने गुजरातहून नाशिकला निघाला होता. शेकडो किलोमीटरचा प्रवास पार करून सोनू नाशिकध्ये पोहोचला. त्याचे घर अवघे 10 ते 15 मिनिटांच्या अंतरावर असताना मांजाने गळा चिरून त्याचा जीव गेला.
येवला तालुक्यात 5 वर्षीय चिमुकल्याच्या नायलॉन मांजामुळे इजा होऊन 14 टाके पडले. तर पिंपळखुटे येथील शुभम पवार यांना देखील गळ्याला नायलॉन मांजामुळे इजा होवून 20 टाके पडले आहेत.
चायनीज मांजामुळे हिंगोलीमध्ये वेगवेगळ्या घटनेमध्ये तीन जणांची मान कापली गेली. यामध्ये दोन जणांची प्रकृती गंभीर असून एक जणाला किरकोळ दुखापत झाली आहे. शेख शेरू शेख दिवाण यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली असून यांना 22 टाके पडले आहेत. त्यांची तब्येत स्थिर आहे दुसऱ्या घटनेमध्ये राहुल कांबळे यांना सुद्धा मानेला दुखापत झाली असून त्यांच्या मानेला 6 टाके पडले आहेत. तर अन्य एक जणाला मानेला किरकोळ दुखापत झाली आहे.
जळगाव शहरातील कानळदा शंभर फुटी रोडवर नायलॉन मांजामुळे दुचाकीवरून घरी जात असताना छत्रपती शिवाजी महाराजनगर मधील रहिवाशी विकी नारायण तरटे या तरुणाचा गळा कापला गेल्याची घटना घडली आहे.
दुचाकीस्वार जेष्ठ नागरिकाला मांजा कापल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पुण्यातील शिवाजी पुलावर घडली आहे. यामुळे त्यांच्या गालाला आणि अंगठ्याला गंभीर दुखापत झाली आहे. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. देवराम दत्तात्रय कामठे ( ६७ रा. पुरंदर, सध्या शिवाजीनगर ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या सातारा परिसरात दुचाकीवरून ड्युटीवर निघालेल्या एका पोलिस उपनिरीक्षकाचा नायलॉन मांजाने गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत गळ्यातून मोठा रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांना येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, दुचाकीवरून जात असलेली महिला नायलॉन मांजामुळे गंभीर जखमी झाली. नाशिकमधील कन्नमवार पूल परिसरातील ट्रॅक्टर हाउसजवळ सोमवारी (ता. ६) ही घटना घडली. पतीच्या वेळेत लक्षात आल्याने हानी टळली.