Bihar News – बिहारमध्ये एका चिनी नागरिकाला अटक करण्यात आली. व्हिसा आणि प्रवासासाठी आवश्यक इतर वैध कागदपत्रांविना भारतात प्रवेश केल्याबद्दल पोलिसांनी ती कारवाई केली. याओ शुझांग असे अटक करण्यात आलेल्या चिनी नागरिकाचे नाव आहे. त्याने नेपाळमधून भारतीय हद्दीत शिरकाव केला. सशस्त्र सीमा बलाच्या (एसएसबी) जवानांनी त्याला ताब्यात घेतले. नंतर त्याला बिहारच्या पूर्व चंपारण जिल्हा पोलिसांकडे सोपवण्यात आले. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी शुझांगला अटक केली. तो खेळण्यांचा व्यवसाय करत असल्याचे समजते. तो व्यवसाय पुढे नेण्यासाठी भारतीय व्यावसायिकांच्या शोधात होता. मात्र, प्रवासासाठीची वैध कागदपत्रे नसल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. एसएसबीच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. भारतात अवैध प्रवेश करण्यामागे त्याचे कुठले अयोग्य मनसुबे होते का या दिशेनेही तपास केला जात आहे. त्यामुळे पोलिसांसह इतर यंत्रणाही त्याची कसून चौकशी करणार आहेत, अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आली. त्यातून चिनी नागरिकाच्या अटकेचे प्रकरण गांभीर्याने घेण्यात आल्याचे सूचित होत आहे.