चायनिज पदार्थ देताहेत कर्करोगाला निमंत्रण

अन्न व भेसळ विभागाने गाड्यांची तपासणी करण्याची मागणी

मेणवली: येथील हुतात्मा स्मारकाशेजारील वर्दळीच्या रस्त्यावर चायनिज गाड्यावरील खाद्यपदार्थाच्या उग्र वासाने नागरिकांचा जीव गुदमरत आहे. खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वापरण्यात येणारा तिखट पावडर मसाला हवेत उडत असल्याने नागरिकांचे डोळे चुरचुरत असल्याचे पहायला मिळत आहे. या गाड्यांवर खाद्यपदार्थांसाठी वापरण्यात आलेला मसाला खाण्यास योग्य आहे की नाही हे अन्न व भेसळ खात्याने तपासण्याची मागणी वाईतील सुज्ञ नागरिकातून केली जात आहे.

हुतात्मा स्मारकालगत चायनिज गाड्यावर चमचमीत पदार्थावर खाण्यासाठी दररोज दुपारी तीन नंतर रात्री उशिरापर्यंत दर्जेदार लोकांची व युवकांची झुंबड उडालेली दिसून येते. सध्या शाळा, महाविद्यालयांनाही सुट्ट्या लागल्याने चायनिज पदार्थ खाण्यासाठी तरुणाईची गर्दी वाढू लागली आहे. चांगल्या तेलात व मसाल्यात बनवलेल्या घरच्या अन्नाला नाक मुरडणारे चायनिज पदार्थांवर ताव मारत असल्याचे दिसून येत आहे.

सर्व नियम धाब्यावर बसवून शहरातील रहदारीच्या मुख्य रस्त्यावर चायनिज गाडे टाकण्यास वाई नगरपालिकेने परवानगी दिल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य रस्त्यावरच दुतर्फा गाड्या उभ्या केल्याने जाणाऱ्या येणाऱ्या सर्व नागरिकांच्या डोळ्यात तिखटाची भुकटी गेल्याची अनुभूती येत आहे. चायनिज पदार्थांची विक्री हे अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधन असले तरी त्यासाठी वापरण्यात आलेले तिखट व मसाला चांगला आहे हे तपासण्याची गरज निर्माण झाली आहे, असे नागरिकांमधून बोलले जात आहे. आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणानुसार अशा प्रकारच्या अन्न सेवनामुळे कर्करोगाला निमंत्रण दिले जाते. याचा परिणाम लहान मुलांवर जास्त होतो याची जाणीव अन्न भेसळ विभागाला नाही का? असा प्रश्न निर्माण वाईकरांच्या मनात निर्माण झाला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.