नवी दिल्ली : देशात एकीकडे चीनच्या विरोधात वातावरण निर्माण झाले आहे तर दुसरीकडे चायनीज टेलीकॉम गिअर मेकर कंपनी हुआवेने पीएम केअर फंडासाठी सात कोटी रुपये दिल्याचे समोर आले आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे.
भारतातील सहा राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर करोनाविरोधात लढण्यासाठी हुआवे या कंपनीने डायरेक्ट पीएम केअर फंडात सात कोटी रुपये दिले आहेत. करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी हुआवे या कंपनीने काही दिवसांपूर्वीच भारताला शरीराचे तापमान तपासणीसंर्भातील अद्ययावत तंत्रज्ञान देण्याची तयारी दर्शविली होती.
हुआवे इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जय चेन यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला याविषयी माहिती सांगितली. चीनमधील आमच्या अनुभवाद्वारे भारतातील सध्याच्या करोनाच्या स्थिती विरोधात लढण्यासाठी शरिराचे तापमान तपासणीसंर्भातील अद्ययावत तंत्रज्ञानचा अभ्यास करत आहे. यात लवकरच आम्हाला यश येईल, असे त्यांनी यावेळी म्हटले. हुआवे कंपनीने दिलेली मदत सध्या ट्विटरवर चर्चेचा विषय आहे. नेटकऱ्यांनी चीनकडून मदत घेण्यावर आक्षेप नोंदवला आहे. तर काहींनी टिकटॉकने किती मदत केली? अशी विचारणा केली आहे.
दरम्यान, करोनाविरोधात लढण्यासाठी भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ यांनी आधीच पीएम केअर फंडासाठी आपली मदत दिली आहे. रिलायन्स जिओने ५०० कोटी तर भारती एअरटेलने १०० कोटी रुपयांची मदत पीएम केअर फंडासाठी दिली आहे.