चिंचवड – जयगुरूदत्त मित्र मंडळाच्या देखाव्याची उंची अधिक झाल्याने हा देखावा चिंचवड पुलाखाली अडकला. देखाव्यातील मूर्ती खाली काढून हा मिरवणूक पुढे जाण्याकरिता प्रयत्न करण्यात आले; मात्र, त्यामध्ये देखील यश न आल्याने अखेर आल्या त्या मार्गाने हे मंडळ परतले.
बिजलीनगरच्या दिशेने आलेल्या जय गुरूदत्त मित्रमंडळाने सादर केलेला देखावा हा उड्डाणपुलाच्या उंचीपेक्षा अधिक होता. तो काहीसा पुढे आला; त्यानंतर अडकला. त्यामुळे बराचवेळ मंडळाची मिवरणूक एकाच जागी थांबून होती. मिरवणूक पुढे जाण्याकरिता शर्थीचे प्रयत्न सुरू होते. त्याकरिता देखाव्यातील मूर्ती खाली काढण्यात आल्या होत्या.
सुमारे अर्धा तास हे प्रयत्न सुरू होते; मात्र, तरीदेखील या प्रयत्नांना यश न आल्याने अखेर हे मंडळ आलेल्या मार्गाने परतले. बिजलीनगर भागातील गणेशमंडळांच्या येणाऱ्या मिरवणूका तुलनेत कमी असल्याने हा देखावा अडकला, तरीदेखील या मार्गावर फारशी कोंडी झाली नाही. तसेच रस्त्यावरील रिकाम्या जागेतून अन्य गणेश मंडळांचा प्रवास निर्विघ्नपणे पार पडला.