चीनच्या उलट्या बोंबा! म्हणे, “कोरोनाविषयी आम्ही काहीही लपवले नाही”

आरोग्य संघटनेचा अहवाल येण्याआधी चीनने दिलेली सफाई

बीजिंग : जगाला हैराण करून सोडणाऱ्या कोरोना विषाणूविषयी अनेक तर्क वितर्क लावण्यात येत होते. त्यातच जागतिक आरोग्य संघटनेने चीनमध्ये जात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडलेल्या वुहानमध्ये पाहणी केली. संघटनेने आपला अहवाल अद्याप सादर केला नाही. परंतु, चीनने आता यावर प्रतिक्रिया दिली आहे. बीजिंगमध्ये अनेक देशांच्या मुत्सद्दींना चीनच्या अधिकाऱ्यांनी या शोधाबाबतची माहिती दिली. याकडे आरोग्य संघटनेचा अहवाल येण्याआधी चीनने दिलेली सफाई म्हणून पाहिले जात आहे.

महामारीची उत्पत्ती ही राजकीय विवादास कारणीभूत ठरली आहे. अमेरिका आणि इतर देशांनी चीनच्या प्रभाव आणि तपासणीच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तर वैज्ञानिक संशोधनाचे राजकारण केले जात असल्याचा आरोप कम्युनिस्ट देशाने केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी यांग ताओ म्हणाले, ‘आमचे उद्दीष्ट पारदर्शकता दर्शविणे आहे. चीनने कोरोनाविरुद्ध पारदर्शक पद्धतीने लढा दिला आहे आणि काहीही लपवले नाही.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या टीमने चीनच्या वुहानचा दौरा केला होता. मध्य चीनच्या वुहानमध्येच 2019 च्या शेवटी कोरोनाचा पहिला रुग्ण समोर आला होता. यावर टीमचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे.

चीनमध्ये पहिला कोरोना रुग्ण आढळल्याच्या घटनेला एक वर्ष होऊन गेलं तरीही शास्त्रज्ञ या रोगाचे कारण शोधू शकलेले नाहीत. कोरोनामुळे जगभरात तब्बल 2.7 दशलक्ष लोकांचे बळी गेले आहेत. यावर अभ्यास केलेल्या काही शास्त्रज्ञांनी सांगितलं, की कोरोना पुढील काही वर्ष असाच राहिलं, कारण हा एक मोसमी आजार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, मागील आठवड्यात जगभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दहा टक्के वाढ झाली आहे. यात सर्वाधिक रुग्ण अमेरिका आणि यूरोपमध्ये आढळले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.