बिजींग – करोनाचे रूग्ण वाढत असतानाच उपचार करून बरे झालेल्यांची संख्या आता वाढत असल्याने ही एक समाधानाची बाब मानली जात आहे. काल गुरूवारी बाधित झालेले 1540 रूग्ण पुर्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. करोनाचे रूग्ण आता मोठ्या संख्येने पुर्ण बरे होत असल्याचे दिसून आल्याने वुहानवासियांमधील भयाचे वातावरण आता थोडे हलके होऊ लागले आहे.
या रोगावर प्रभावी औषधच मिळत नसल्याने सुरूवातीला सर्व नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण होते. पण चीन सरकारने युद्ध पातळीवर त्याच्या नियंत्रणाची उपाययोजना केल्याने आता या रोगाच्या प्रसाराला अटकाव बसू लागल्याचे चित्र आहे.
असं असलं तरी चीन मधील करोना बळींची संख्या 636 वर गेली आहे. गुरूवारी या रूग्णांपैकी 73 जणांनी अखेरचा श्वास घेतला. त्यातील एकट्या वुहान शहरातील बळींची संख्या काल 69 इतकी नोंदवली गेली आहे. त्यातच या विषाणुजन्य रोगाने बाधित असलेल्यांची संख्याही आता 31 हजार 161 वर पोचली आहे.