अमित शहा यांच्या अरुणाचल दौऱ्याला चीनचा आक्षेप

परराष्ट्र मंत्रालयाने दिले स्पष्ट शब्दात प्रत्त्युत्तर

नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशच्या स्थापना दिनानिमित्त गृहमंत्री अमित शहा यांच्या अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्याला चीनने आक्षेप घेतला आहे. शहा यांच्या दौऱ्यामुळे चीनच्या भौगोलिक सार्वभौमत्वाचा आणि परस्परांच्या राजकीय विश्‍वासाचा भंग केला आहे, असा आरोप चीनच्यवतीने करण्यात आला. मात्र भारताने चीनचा हा आक्षेप स्पष्ट शब्दात फेटाळून लावला आहे.

भारत-चीन सीमेच्या पूर्व भागावर किंवा चीनच्या तिबेट भागाच्या दक्षिणेकडील भागाबाबत चीनची भूमिका स्पष्ट आणि कायम आहे, असे चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी गुरुवारी प्रसिद्धीमाध्यमांना सांगितले. चीन सरकारने कधीही अरुणाचल प्रदेशला मान्यता दिलेली नाही आणि भारतीय नेत्यांनी या भागाला भेट देण्याला कायमच विरोध केला आहे.

सीमा विषयक मुद्दयामध्ये गुंतागुंत निर्माण होईल, अशी कृती भारतीय नेत्यांनी करू नये. सीमाभागात शांतता कायम राखण्यासाठी ठोस कृती करावी, असा अनाहुत सल्लाही या प्रवक्‍त्याने भारताला दिला आहे. मात्र अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य आणि स्वायत्त भूभाग आहे. देशातील अन्य राज्यांना भेट द्यावी, त्याच प्रमाणे भारतीय नेते अरुणाचल प्रदेशलाही भेट देत असतात, अशा शब्दामध्ये परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍ते रवीश कुमार यांनी चीनचा आक्षेप फेटाळला आहे.

अरुणाचल प्रदेशाबाबत आमची भूमिका स्पष्ट आणि पहिल्यापासून कायम आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य आणि स्वायत्त भाग आहे, भारतीय नेत्यांच्या दौऱ्याला आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही. असा आक्षेप घेणे भारतीय नागरिकांच्या तर्क आणि समजुतीपलिकडे आहे, असे रवीश कुमार म्हणाले.

अरुणाचल प्रदेशच्या 34 व्या स्थापना दिनानिमित्त रस्ते आणि उद्योगांशी संबंधित विविध विकासकामांचे उद्‌घाटन करण्यासाठी शहा अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर गेले आहेत. भारतीय नेत्यांकडून होणाऱ्या अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर चीनकडून वारंवार आक्षेप घेतला जात असतो.

चीनच्या सीमेलगतच्या भूभागावर चीनकडून हक्क सांगितला जात असतो. भारत आणि चीनमध्ये 3,488 किलोमीटर लांबीच्या प्रत्यक्ष ताबा रेषेवरून वाद आहे. अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा चीनकडून केला जातो. दोन्ही देशांमध्ये सीमावाद सोडवण्यासाठी नियुक्‍त केलेल्या विशेष प्रतिनिधींच्या चर्चेच्या 22 फेऱ्या झाल्या आहेत.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.