बीजिंग, दि. 11 – चीनमध्ये करण्यात आलेल्या जनगणनेचे निष्कर्ष जाहीर करण्यात आला असून त्या देशाच्या लोकसंख्येत अत्यल्प वाढ नोंदवली गेली आहे. ही वाढ 0.53 टक्के इतकी आहे. पुढील वर्षांपासून लोकसंख्येत घट निर्माण होईल अशी माहिती तेथील अधिकाऱ्यांनी दिली.
नव्या जनगणनेनुसार चीनची लोकसंख्या आता 142 कोटी 20 लाख इतकी आहे. चीनमध्ये करण्यात आलेली ही सातवी जनगणना होती. या लोकसंख्येत हॉंगकॉंग आणि मकाऊची लोकसंख्या जमेला धरण्यात आलेली नाही. चीनने हे प्रांत आपल्याच देशाचा भाग असल्याचे जाहीर केले होते.
या पाहणीचे काही निष्कर्ष चिंताजनक आहेत. त्यानुसार चीनच्या वृद्धांच्या संख्येत 18.7 टक्के इतकी वाढ झाली असून 60 वर्षांवरील लोकांची संख्या आता 264 दशलक्ष इतकी झाली आहे. ही वाढ लोकांच्या विकासाच्यादृष्टीने चिंताजनक ठरणार आहे असे तेथील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. 13 ते 58 वयोगटाचे तेथील नागरिक 894 दशलक्ष इतके आहेत. या गटातील नागरिकांच्या संख्येत 6.79 टक्के इतकी घट नोंदवण्यात आली आहे.
या आधी सन 2010 मध्ये करण्यात आलेल्या जनगणनेशी तुलना करता ही टक्केवारी आढळून आली आहे. चीनमध्ये वर्किंग क्लासची लोकसंख्या कमी होत असून त्यामुळे मजुरांच्या अभावाचीही समस्या या देशात येत्या काही काळात निर्माण होणार आहे. देशातील ग्राहक कंझम्प्शनही त्याच प्रमाणात कमी होणार असून वृद्धांच्या देखभालीवरील खर्च वाढणार आहे, असेही निष्कर्ष यातून काढण्यात आले आहेत. सहाव्या जनगणनेत लोकसंख्या वाढीचे प्रमाण 0.57 टक्के इतके होते तर 2000 साली करण्यात आलेल्या जनगणनेत लोकसंख्या वाढीचे प्रमाण 1.7 टक्के इतके होते.