नेपाळमधील राजकीय पेच सोडवण्यासाठी चीनचा पुढाकार

कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्यांना नेपाळमध्ये पाठवले

बीजिंग/ काठमांडू – नेपाळमध्ये संसदेचे कनिष्ठ सभागृह विसर्जित केल्यानंतर उद्‌भवलेल्या राजकीय पेचावर तोडगा काढण्यासाठी चीनमधील कम्युनिस्ट पार्टीच्या चार वरिष्ठ नेत्यांचे पथक नेपाळमध्ये पाठवले आहे.

नेपाळमधील राजकीय स्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी आणि नेपाळ कम्युनिस्ट पार्टीमध्ये फूट पडण्यापासून वाचवण्यासाठी हे पथक प्रयत्न करणार आहे. पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांच्या शिफारसीनुसार अध्यक्षा बिद्या देवी भांडारी यांनी संसदेचे कनिष्ठ सभागृह विसर्जित करून एप्रिल-मे महिन्यात मुदतपूर्व निवडणूका घेण्याचे जाहीर केले आहे.

पंतप्रधान ओली आणि सत्तारुढ कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या नेतृत्वाखालील गटांमध्ये सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पार्टीमध्ये अक्षरशः फूट पडली आहे. ओली यांच्या नेतृत्वाखाली सीपीएम-युएमएल आणि प्रचंड यांच्या नेतृत्वाखालील सीपीएन-माओवादी सेंटरमध्ये 2018 च्या मे महिन्यात सामील करण्यात आले.

त्यानंतर दोन्ही गटांकडे पंतप्रधानपद 18 महिन्यांसाठी विभागून देण्याची तडजोड करण्यात आली होती. मात्र दोन्ही गटांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाल्यामुळे पक्षात उभी फूट पडण्याची चिन्हे आहेत. हे टाळण्यासाठी चीनमधील कम्युनिस्ट पार्टीतील आंतरराष्ट्रीय विभागाचे उपमंत्री गौऊ योन्झाउ हे नेपाळमध्ये येत असल्याचे नेपाळ कम्युनिस्ट पार्टीच्या दोन नेत्यांनी सांगितले. गौऊ योन्झाउ यांच्या नेतृत्वाखाली चार जणांचे पथक नेपाळमध्ये येत असल्याचेही काठमांडूत प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे.

चार दिवसांच्या दौऱ्यात हे पथक नेपाळमधील बहुतेक वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहे.
चीनच्या पथकाच्य भेटीबाबत नेपाळमधील चीनी दूतावासाकडून स्पष्टपणे काहीही सांगितलेले नाही. मात्र नेपाळमधील चिनी राजदूत हाऊ यांकी यांनी गेल्या काही दिवसात नेपाळमधील अनेक नेत्यांची भेट घेतली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.