चीनचे कारखानदारीचे दिवस संपले

आयफोन निर्माण करणाऱ्या फॉक्‍सकॉन कंपनीचा दावा

नवी दिल्ली – चीनने अनेक देशांबरोबर विनाकारण शत्रुत्व पत्करल्यामुळे चीनमधील परदेशी कंपन्यांची उत्पादन केंद्रे इतर देशात जात आहेत. त्यामुळे विविध वस्तूंचा जगाचा कारखाना म्हणून असलेली चीनची ओळख संपुष्टात येणार आहे, असे फॉक्‍सकॉन कंपनीच्या प्रमुखांनी म्हटले आहे.

फॉक्‍सकॉन कंपनी आयफोन निर्माण करते. जूनमध्ये आमच्या एकूण उत्पादनापैकी 30 टक्के उत्पादन चीनमधून होत होते. काही महिन्यातच हे प्रमाण 25 टक्‍क्‍यांवर आले आहे. हळूहळू आम्ही चीनमधील उत्पादन केंद्र भारत आणि इतर देशात हलविण्याची तयारी सुरू केली आहे, असे फॉक्‍सकॉन कंपनीचे अध्यक्ष वांग लिव यांनी सांगितले. कंपनी ऍपल आणि डेल या कंपन्याबरोबरच इतर अनेक कंपन्यांची उत्पादने तयार करते. 

भारत व अमेरिकेसारख्या देशांनी चिनी उत्पादनावर आयात शुल्क वाढविले आहे. त्यामुळे चीनमध्ये उत्पादन तयार केल्यानंतर आमच्या ताळेबंदावर परिणाम होईल. यासाठी आम्ही ही उत्पादन केंद्रे चीनमधून इतरत्र हलवीत आहोत असे ते म्हणाले.

फॉक्‍सकॉनशिवाय सॅमसंग सारख्या इतर अनेक कंपन्यांनी आपली उत्पादन केंद्रे चीनमधून हलविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतामध्ये चीनमधून मोठ्या प्रमाणात मोबाइल फोन येत होते. मात्र, गेल्या काही महिन्यापासून भारतातून होणारी आयात कमी झाली आहे. 

फॉक्‍सकॉनचे भारतात उत्पादन केंद्र कार्यरत
गेल्या चार- पाच वर्षापासून फॉक्‍सकॉन कंपनी भारतात सक्रिय आहे. चीनमधील घडामोडी वाढल्यानंतर या कंपनीने चेन्नई येथील आपल्या उत्पादन केंद्रातून उत्पादन सुरू केले आहे. आणखी काही उत्पादन केंद्रे सुरू करण्यासाठी फॉक्‍सकॉन कंपनी प्रयत्न करीत आहे. केंद्र सरकारने इलेक्‍ट्रॉनिक उद्योगासाठी जाहीर केलेल्या अनुदान योजनेचा हे या कंपनीला लाभ होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.