संरक्षण दलांवर चीनचा अवाढव्य खर्च

बिजींग: चीन हा लष्करावर सर्वाधिक खर्च करणारा जगातील अमेरिकेनंतरचा दुसरा मोठा देश असून त्यांनी यंदा लष्करावर तब्बल 175 अब्ज डॉलर्स इतका खर्च केला आहे. गरजेनुसार यात आणखीही वाढ केली जाणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले आहे. त्यांचा हा संरक्षण दलांवरील खर्च भारताच्या तिप्पट आहे. तथापी अन्य कोणत्यांही देशाला धमकावण्यासाठी हा वाढीव खर्च केला जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. चीनी लष्करावर सध्या नेमका किती खर्च केला जात आहे याची माहिती पंतप्रधान लि केकियांग हे उद्या मंगळवारी नॅशनल पिपल्स कॉंग्रेसला सादर केल्या जाणाऱ्या अहवालातून मांडणार आहेत.

नॅशनल पिपल्स कॉंग्रेसचे प्रवक्ते झांग येसुई यांनी आज पत्रकार परिषदेत चीनच्या वाढीव संरक्षण खर्चाचे जोरदार समर्थन केले. ते म्हणाले की जगातील अन्य विकसनशील देशांच्या एकूण लष्करी खर्चाच्या मानाने आमचा लष्करावरील खर्च कमीच आहे. देशाच्या विदेश आणि संरक्षण नितीनुसार हा खर्च ठरवला जातो. या मागे कोणालाही आमचे लष्करी सामर्थ्य दाखवण्याचा किंवा धमकावण्याचा उद्देश नाही असे त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले. चीनने संरक्षण खर्चातील अलिकडच्या काळात केलेली वाढ ही 8.1 टक्‍क्‍यांनी अधिक आहे. तथापी ही रक्कम एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या केवळ 1.3 टक्के इतकी असून जगातील अन्य विकसित देश त्यांच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात्या दोन टक्के इतका निधी त्यांच्या लष्करावर करीत असतात त्यामुळे आम्हाला यात वाढ करण्यास अजून वाव आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

अमेरिकेच्या लष्करावरील खर्च हा यंदा 771 अब्ज डॉलसवर गेला आहे. या साऱ्या खर्चाच्या तुलनेत भारताच्या संरक्षण खात्यावरील खर्चातील वाढ मात्र अगदीच अत्यल्प मानली जात आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारताने संरक्षण खात्यावर 2.98 लाख रूपये इतक्‍या खर्चाची तरतूद केली होती यावेळी त्यात किचींत वाढ करून ती आता 3.18 लाख कोटी इतकी करण्यात आली आहे. चीनने आता आपल्या नौदल सामर्थ्यावर जादा भर देण्याचे योजले असून त्यांनी पाच विमान वाहू नौका, आणि एक अण्वस्त्र सज्ज जहाज आणि पाणबुड्या नौदलात समाविष्ट करण्याचे ठरवले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.