बीजिंग – जगातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनचा जुलै -सप्टेंबर या तिमाहीतील विकास दर केवळ 4.9 टक्के इतका नोंदला गेला आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम संभवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चीनमधील बलाढ्य बांधकाम क्षेत्रावर परिणाम झाला आहे. कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे ऊर्जा क्षेत्र अडचणीत आले आहे. त्याचबरोबर ग्राहकाकडून कमी मागणी नोंदविली जात आहे. याचा एकत्रित परिणाम होऊन चीनचा विकास दर कमी झाला असल्याचे समजले जाते. जानेवारी-मार्चदरम्यान चीनचा विकास दर तब्बल 18.3 टक्के तर एप्रिल-जून दरम्यानचा विकास दर 7.9 टक्के होता.
त्यामुळे आशादायक परिस्थिती निर्माण झाली असतानाच जुलै-सप्टेंबरदरम्यानचा विकास दर मात्र फारच कमी झाला असल्याचे दिसून येत आहे. जागतिक बाजारातून चीनला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे अंतर्गत बाजारपेठेवर चीनने लक्ष केंद्रित केले असतानाच अंतर्गत मागणीही कमी झाल्यामुळे चीनसमोर मोठा आर्थिक पेचप्रसंग निर्माण होतो की काय अशी शंका निर्माण होऊ लागली आहे.
चीनने अमेरिका, भारत, जपान, तैवान, ऑस्ट्रेलिया या देशासह अनेक देशाबरोबर संबंध बिघडऊन ठेवले आहेत. त्यामुळे चीनच्या निर्यातीवर आगामी काळात परिणाम संभवतो. अशा परिस्थितीमध्ये अर्थव्यवस्थेचा वेग कायम ठेवण्याचे चीनसमोर मोठे आव्हान राहणार आहे.