चीनला अंतराळ मोहिमेत मोठे यश; मंगळावर यशस्वीपणे उतरवले अवकाशयान

बीजिंग: संपूर्ण जगाला चिंतेत टाकून चीनने अंतराळ मोहिमेत मोठे यश मिळवले आहे. चीनने मंगळ ग्रहावर यशस्वीरित्या अवकाशयान उतरवले आहे. चीनच्या या अवकाशयानाचे नाव ताईन्वेन-1 (Tianwen-1 ) असे आहे. मंगळ ग्रहावर अवकाशयान उतरवणारा चीन हा दुसरा देश ठरला आहे.

चीनने  मंगळावर पाठवलेले अवकाशयान हे मानवविरहीत आहे. ताईन्वेन हे अवकाशयान चीनच्या अंतराळ संशोधन केंद्रातून पाठवण्यात आले. चीनमधील वृत्तसंस्था शिनुआनं याबाबत वृत्त दिलं आहे. चीनचे  हे मंगळावरील पहिले पाऊल आहे. ताईन्वेन-1 हे अवकाशयान मंगळावर उतरलेल्या ठिकाणाला युटोपिया प्लॅन्शिया म्हटले  जाते.

ताईन्वेन-1 अवकाशयानातून सौर ऊर्जेवर चालणारा रोव्हर झुरोंग  पाठवण्यात आला आहे. झुरोंग हा रोव्हर मंगळावर उतरलेल्या ठिकाणाचं सर्वेक्षण करेल आणि माहिती चीनच्या अवकाश संशोधन केंद्राकडे पाठवेल. झुरोंग रोव्हरवर टोपोग्राफी कॅमेरादेखील बसवण्यात आलेला आहे. रोव्हर मंगळ ग्रहावरील माती आणि वातावरणाचा अभ्यास करेल. याशिवाय मंगळग्रहावरील प्राचीन जीवन, पाणी आणि बर्फ याबाबतही अभ्यास केला जाणार आहे.

चीनने  पाठवलेल्या अवकाशयानाला एका कवितेवरुन नाव देण्यात आले आहे. ताईन्वेन हे पाच टन वजन असलेले अवकाशयाने  चिनी बेट हैनान येथून गेल्या वर्षी जुलै महिन्यात प्रक्षेपित करण्यात आले  होते. सहा महिन्यांच्या कालावधीनंतर फेब्रुवारीमध्ये अवकाशयानाने  मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला होता. झुरोग रोव्हर यशस्वीरित्या कार्यरत झाल्यास चीन हा पहिल्याच मोहिमेत यशस्वी ठरणारा देश ठरेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.