बीजिंग – तालिबानचे समर्थन केल्यामुळे चीनमध्ये नापसंतीची प्रतिक्रिया उमटली आहे. मात्र तालिबानने अफगाणिस्तानचे नियंत्रण घेणे ही तेथील नागरिकांचीच गरज होती, असे चीनमधील सरकारी प्रसिद्धी माध्यमे आणि राजकीय मुत्सद्यांकडून वारंवार सांगितले जाऊ लागले आहे. मात्र ज्यांना तालिबानचा इतिहास माहिती आहे त्यांच्याकडून या वैचारिक भूलथापांवर टीका केली जाऊ लागली आहे.
चीनकडून शिन्जियांग प्रांतातील ईस्ट तुर्कस्तान इस्लामिक मुव्हमेंटशी तालिबानचा संबंध जोडला जात असतो. मात्र अमेरिकेने आपरले सैन्य माघारी घेतल्यापासून चीनने आपल्या धोरणात “यु टर्न’ केला असून तालिबानशी जवळीक वाढवली आहे. चीन सरकारच्या या बदललेल्या धोरणावर चीनमध्येच दबक्या आवाजात तीव्र नापसंती व्यक्त व्हायला लागली आहे.
अफगाणिस्तानमधील अस्थैर्याचा पाकिस्तानवर परिणाम होणे सहाजिक आहे. पाकिस्तानमधील बेल्ट ऍन्ड रोड प्रकल्पात चीनची 50 अब्ज डॉलरची गुंतवणूक आहे. पाकिस्तानाच्या सीमेवर अफगाणिस्तामुळेच कट्टरवाद फोफावू लागला आहे, याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला आहे.
चीनचे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुन्यिंग यांनी आताचा तालिबान 20 वर्षांपूर्वीपेक्षा खूपच सुधारलेला आणि आधुनिक असल्याचे म्हटले आहे. अफगाणिस्तानमध्ये लोकशाही लादण्याचा अमेरिकेचा प्रयत्न फसला आहे, यावर त्यांनी भर दिला. तालिबानची स्थापना अफगाणिस्तानमधील यादवी युद्धाच्या काळात विद्यार्थी संघटनांमधून झाली असल्याचा एक व्हिडीओ मुद्दाम पसरवण्यात येत आहे.