संरक्षण : चीनचे सायबर हल्ले आणि आपण

-ब्रिगे. हेमंत महाजन (निवृत्त)

चीनने लडाखमध्ये भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्यानंतर गलवान खोऱ्यात संघर्ष झाला होता. त्यानंतर चीनने भारतावर सायबर हल्ले करण्यास सुरुवात झाली होती, असे वृत्त “न्यूयॉर्क टाइम्स’ने दिले आहे.

लडाखमध्ये तणाव सुरू असताना चिनी हॅकर्सकडून भारतावर सायबर हल्ले वाढवण्यात आले. भारतासाठी महत्त्वाचे असणारे 10 क्षेत्र, संस्था, कंपन्यांची निवड हॅकर्सने केली. यामध्ये चार ते पाच विभाग हे लोड डिस्पॅच सेंटरशी निगडीत आहे. त्याशिवाय भारताचे दोन बंदरही चिनी हॅकर्सच्या निशाण्यावर होते. संपूर्ण भारतातील वीज पुरवठा खंडित करण्याचा डाव चिनी हॅकर्सचा होता. चिनी हॅकर्सने तब्बल 40 हजार 500 वेळा सायबर हल्ले केले होते. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर चिनी हॅकर्सने चिनी मालवेअरने भारतात वीज पुरवठा नियंत्रित करणाऱ्या प्रणालीत घुसखोरी केली. चीनशी निगडीत असलेल्या रेडइकोने भारतातील विद्युत यंत्रणेत मालवेअर प्लांट केले. त्याशिवाय भारताचे अतिशय संवेदनशील राष्ट्रीय पायाभूत सुविधांही चिनी हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत. सिस्टीम हॅक करण्यासाठी चिनी हॅकर्स अतिशय अत्याधुनिक व्हायरसचा वापर करत आहे.

ऑनलाइन धोक्‍याबाबत विश्‍लेषण करणारी कंपनी रेकॉर्डेड फ्यूचरने चिनी मालवेअरचा शोध घेतला आहे. अद्यापही अधिक मालवेअर सक्रिय करण्यात आले नाहीत, असे आढळून आले आहे. चीन सरकारचा पाठिंबा असलेल्या या सायबर हॅकर्सने 2020 या वर्षाच्या सुरुवातीला सायबर हल्ले तीव्र केले होते. अलीकडेच भारतीय संरक्षण दलांवर सायबर हल्ला झाला. भारताच्या महत्त्वाच्या पायाभूत संरचनेवर होणारे सायबर हल्ले मुख्यत्वे चिनी किंवा पाकिस्तानी हॅकर्सकडून केले जातात. लष्करी दलांसाठी संरक्षण सायबर एजन्सी या विभागाचे काम पाकिस्तान आणि चीनकडून वाढत असलेल्या सायबर हल्ल्यांचा प्रतिकार करणे, हे असेल.

गलवान खोऱ्यामध्ये रक्‍तबंबाळ झाल्यानंतर चीनने भारतावर चालवलेले हायब्रीड वॉर अजून तीव्र करेल यामध्ये काहीच आश्‍चर्यजनक नाही. चीन सायबर हल्ले करू शकतो, हे सुद्धा सगळ्यांनाच माहिती आहे. “न्यूयॉर्क टाइम्स’ सारखी मोठी वर्तमानपत्रे ज्या वेळेला असे लेख लिहितात, त्या वेळेला भारतातली मीडिया त्यांच्याकडे जास्त लक्ष देते. खरे म्हटले तर हा सायबर वॉरपेक्षा मानसिक युद्ध म्हणजे प्रपोगंडा वॉरचा प्रकार आहे. ही बातमी भारतावर प्रपोगंडा वॉर करण्यासाठी चीनने “न्यूयॉर्क टाइम्स’ मध्ये प्रकाशित केली का? या लेखात असे सांगण्यात आले आहे की, भारतात मुंबईवर झालेल्या सायबर हल्ल्याचा शोध एका अमेरिकन कंपनीने लावला. हे सत्य आहे का? अशा हल्ल्यांचा शोध लावायला आपल्याला अमेरिकेच्या संस्थेची मदत जरुरी आहे का? तर त्याचे उत्तर आहे अजिबात नाही.
भारताची नॅशनल टेक्‍नॉलॉजी रिसर्च ऑर्गनायझेशन (एनटीआरओ) ही तंत्रज्ञानाच्या मदतीने गुप्तहेर माहिती काढणारी महत्त्वाची संस्था आहे.तिच्या अंतर्गत भारताच्या दोन संस्था नॅशनल क्रिटिकल इन्फॉर्मेशन अँड इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रोटेक्‍शन सेंटर आणि सायबर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम, (सीईआरटी) सायबर हल्ल्यांवरती किंवा हॅकिंग हल्ल्यावरती लक्ष ठेवून असतात.

नॅशनल क्रिटिकल इन्फॉर्मेशन अँड इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रोटेक्‍शन सेंटर ही संस्था देशातील राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या संस्थांच्या सायबर नेटवर्कचे रक्षण करते. वेळोवेळी या संस्थांचे सुरक्षा ऑडिट करते आणि संस्थांमध्ये असलेली कमतरता त्यांना सांगितली जाते. याशिवाय योग्य वेळी जसा दहशतवादी हल्ल्याचा इशारा मिळतो असाच सायबर हल्ल्यांचा इशारा दिला जातो आणि सुरक्षेची पातळी अजून जास्त वाढवली जाते. या संस्थेला भारताच्या क्रिटिकल इन्फॉर्मेशन आणि इन्फ्रास्ट्रक्‍चरचे रक्षण करण्यामध्ये बऱ्यापैकी यश मिळाले आहे.

मात्र ज्या वेळेला चीन किंवा पाकिस्तान सायबर हल्ला करण्यामध्ये यश मिळवतात, त्यावेळेला दुसरी संस्था म्हणजे कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ही लगेच कारवाई करते आणि जशी सैन्याची क्‍विक रिऍक्‍शन टीम दहशतवादी हल्ल्याला लगेच प्रत्युत्तर देते, तसेच काम ही टीम करते. यांचा रिस्पॉन्स किंवा प्रतिक्रिया ही अतिशय वेगवान असते. कारण शत्रूचा हल्ला काही सेकंदांमध्ये केला जातो, म्हणूनच यांना सदैव तयार राहावे लागते.

यापुढील निर्णायक युद्ध हे सायबर युद्ध असेल. कारण देशाची सर्व प्रकारची माहिती आज संगणकांमध्येच एकत्रित केलेली असते. सायबर क्षेत्रांमध्ये रोज काहीतरी नव नवीन संशोधन केले जाते म्हणूनच आपल्याला जसे अँटीव्हायरसपासून आपल्या कॉम्प्युटरची सुरक्षा करावी लागते तशीच कामगिरी या संस्थाकरत असतात. चीन भारतावरती हल्ले करण्याकरता रोजच नव नवीन प्रकारांचा वापर करतो आणि आपण आपले रक्षण करण्याचा प्रयत्न करतो. परंतु कुठल्याही रक्षा पद्धतीला स्वतःचे सदैव रक्षण करणे हे फार मोठे आव्हान असते. म्हणूनच जसा सर्जिकल स्ट्राइक आपण कश्‍मीरमध्ये केला होता अशाच प्रकारचा सर्जिकल स्ट्राइक सायबर लढाईमध्ये चीनवर वेळोवेळी करण्याची गरज आहे. त्यांना हे दाखवून देणे महत्त्वाचे आहे की जर तुम्ही आमच्यावर हल्ला करून आमच्या क्रिटिकल इन्फॉर्मेशन अँड इन्फ्रास्ट्रक्‍चरला धोका निर्माण केला तर त्या पेक्षासुद्धा मोठा धोका आम्ही तुमच्या इन्फ्रास्ट्रक्‍चरला निर्माण करून तुमचेसुद्धा नुकसान करू शकतो, म्हणून असा हल्ला करायची हिंमत करू नका.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.