बीजिंग -करोना फैलावाची दुसरी लाट येण्याच्या इशाऱ्याचा चीनने प्रचंड धसका घेतला आहे. त्यातून जगभरातील करोना फैलावाचे केंद्र बनलेल्या चीनमधील वुहान शहरातील सर्व नागरिकांची करोनाविषयक चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मागील वर्षाच्या अखेरीस म्हणजे डिसेंबरमध्ये चीनमध्ये सर्वप्रथम करोनाचा उद्रेक आढळला. नंतर जागतिक साथ बनलेल्या करोना फैलावाचे जन्मस्थळ चीनचे वुहान शहर ठरले. चालू वर्षी 23 जानेवारीपासून चीनमधील हुबेई प्रांत आणि त्या प्रांताची राजधानी असणाऱ्या वुहानमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला. करोनाचा फैलाव आटोक्यात आल्याने तो लॉकडाऊन 8 एप्रिलला उठवण्यात आला.
मात्र, जवळपास महिनाभरानंतर वुहानमध्ये पुन्हा 6 करोनाबाधित आढळले. त्यामुळे चीनची झोप उडाली आहे. त्यातून वुहानमधील सर्व नागरिकांची चाचणी घेण्यात येणार आहे. त्या शहराची लोकसंख्या 1 कोटीपेक्षा अधिक आहे. आता त्या सर्व नागरिकांची चाचणी घेण्यासाठी 10 दिवसांची योजना आखण्यात आली आहे.
चीनमध्ये एकूण 82 हजारांहून अधिक बाधित आतापर्यंत आढळले. त्यातील 50 हजारांहून अधिक बाधितांची नोंद एकट्या वुहानमध्ये झाली. चीनमध्ये करोनाने 4 हजार 633 रूग्णांचा बळी घेतला. त्यातील 3 हजार 869 वुहानमधील होते.