वॉशिंग्टन : अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने एक मोठा दावा केला आहे. ते म्हणतात की, चीन लवकरच क्युबामध्ये हेरगिरी केंद्र उघडणार आहे. अमेरिकेतील फ्लोरिडापासून दूर असलेल्या एका बेटावर हे केंद्र उभारले जाणार आहे. गुप्तचर विभागाचे म्हणणे आहे की क्युबा आणि चीनमध्ये ही इलेक्ट्रॉनिक इव्हज्ड्रॉपिंग सुविधा उभारण्यासाठी एक गुप्त करार झाला आहे. या माध्यमातून चीन अमेरिकेवर लक्ष ठेवणार आहे.
दरम्यान, चीनने हे हेरगिरी केंद्र बांधण्यास सुरुवात केली आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, हे सर्व दावे क्युबाचे उपपरराष्ट्र मंत्री कार्लोस फर्नांडिस डी कोसिओ यांनी फेटाळून लावले आहेत. या वृत्तांमध्ये तथ्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
एका अहवालात म्हटले आहे की अमेरिकेच्या दोन प्रतिस्पर्ध्यांमधील करार हा बायडेन प्रशासनासाठी चिंतेचा विषय आहे. या दोन्ही देशांवर कम्युनिस्ट सरकारचे राज्य आहे, ज्यामुळे अमेरिकेच्या किनाऱ्याजवळ एक नवीन धोका निर्माण झाला आहे. अमेरिका आणि चीनने तणाव कमी करण्यासाठी काही तात्पुरती पावले उचलली असताना हा करार झाला आहे.
विशेष म्हणजे अशा कृत्याचे वृत्त समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. या वर्षी फेब्रुवारीमध्ये अमेरिकेने एका संशयित चिनी गुप्तहेराचा फुगा खाली पाडला होता. चीनने याला सामान्य हवामान बलून म्हटले आहे. तर अमेरिकेने दावा केला आहे की या फुग्यात अनेक हेरगिरीसाठी उपयुक्त उपकरणे तैनात करण्यात आली आहेत.
अमेरिकेच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले की चीन आणि क्युबामध्ये हेरगिरी केंद्राबाबत तत्त्वत: करार झाला आहे. यासाठी चीन क्युबाला अब्जावधी डॉलर्स देण्यासही तयार आहे.