डेहराडून – कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शुक्रवारी उत्तराखंडमध्ये एलएसीजवळ चिनी सैन्य उभारल्याच्या वृत्तावरून मोदी सरकारवर निशाणा साधला. चीनचा मुकाबला पोकळ दाव्यांनी न करता सामरिक पद्धतीने व्हायला हवा, अशी मागणीही त्यांनी केली.
उत्तराखंडच्या सीमेवर चीनकडून सुरू असलेल्या बांधकामाची छायाचित्रे ट्विटरवर शेअर करत खर्गे यांनी लिहिले आहे की, उत्तराखंडमध्ये नियंत्रण रेषेजवळ बांधकामे करुन, धाडसी चिनी सैन्य आपल्या प्रादेशिक अखंडतेवर परिणाम करत आहे. पंतप्रधानांनी चीनला दिलेल्या क्लीन चिटची आपल्या देशाला मोठी किंमत मोजावी लागत आहे. चीनचा सामना यापुढे पोकळ दाव्यांनी नव्हे तर धोरणात्मक पद्धतींनी केला पाहिजे.
भारताच्या चीनसोबतच्या धोरणांबाबत कॉंग्रेस सातत्याने केंद्र सरकारला प्रश्न विचारत आहे. आमचे सरकार बीजिंगचा सामना का करत नाही, असा सवाल त्यांनी केला. पूर्व लडाखमधील सीमेवरील परिस्थिती सामान्य न झाल्यास चीनसोबतचे संबंध सामान्य होण्याची आशा नसल्याचे भारताने गुरुवारी सांगितले होते.
गेल्या नऊ वर्षांतील मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले होते की, चीन हा एक असा देश आहे ज्याच्याशी भारताचे संबंध गेल्या काही वर्षात फारशी प्रगती करू शकलेले नाहीत. वर्ष 2020 मध्ये, चीनने सीमा कराराचे उल्लंघन करत मोठ्या संख्येने आपले सैन्य तैनात केले. त्यामुळे भारतीय सीमांच्या संरक्षणाविषयी कॉंग्रेस जागरुक असल्याचे खर्गे यांनी शेवटी सांगितले.