बीजिंग : चीनने जगातील सर्वात वेगवान रेल्वेचा प्रोटोटाईप लॉंच केला आहे. सीआर४५० असे या प्रोटोटाईपचे नाव आहे. या रेल्वेने वेगवान रेल्वेचा नवीन विश्वविक्रम केला आहे. या रेल्वेने चाचणी च्यावेळी ताशी ४५० किमी असा उल्लेखनीय वेग गाठला आणि जगातील सर्वात वेगवान हाय-स्पीड ट्रेनचा मान मिळवला, असे चायना स्टेट रेल्वे ग्रुप कंपनी या सरकारी रेल्वे कंपनीने म्हटले आहे. हा प्रोटोटाइप चीनमधील प्रवासाच्या लँडस्केपमध्ये आणखी क्रांती घडवून आणण्यासाठी डिझाइन केले आहे, असेही कंपनीने म्हटले आहे.
नवीन ट्रेन मॉडेल देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी वाढवून, प्रमुख शहरांमधील प्रवासाचा कालावधी खूपच कमी करेल अशी अपेक्षा आहे. रेल्वे तंत्रज्ञानातील ही झेप देशभरातील लाखो प्रवाशांसाठी केवळ अधिक सोयीच नव्हे तर कार्यक्षमतेतही सुधारणा घडवून आणेल अशी आशा आहे.
प्रवासाचा वेग वाढवण्याव्यतिरिक्त, सीआर४५० प्रोटोटाइपचा आर्थिक विकासावर सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा आहे, जलद गाड्यांमुळे लोकांची आणि मालाची लांब पल्ल्यापर्यंत अधिक परिणामकारक वाहतूक सुलभ होईल.
सीआर४५० प्रोटोटाइप कमाल ताशी ४५० किमी वेगाने पोहोचण्यास सक्षम आहे. व्यवसायिक प्रवासासाठी हा वेग ताशी ४०० किलोमीटर इतका राहू शकतो. यामुळे ती जगातील सर्वात वेगवान हाय-स्पीड ट्रेन बनते. या अभूतपूर्व वेगामुळे मोठ्या शहरांमधील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल.
ही ट्रेन २२ टक्के अधिक ऊर्जा-कार्यक्षम, १० टक्के हलकी आणि २ डेसिबल कमी केबिन आवाज करणारी आहे. या रेल्वेमध्ये प्रवाशांची संख्या ४ टक्के जास्त असेल आणि प्रगत ट्रेन नियंत्रण, ड्रायव्हर परस्परसंवाद, सुरक्षितता निरीक्षण आणि सुधारित प्रवासी सेवा यासह अपग्रेड केलेल्या इंटेलिजेंट सिस्टम ही या हायस्पीड रेल्वेची वैशिष्ट्ये आहेत.