इस्लामाबाद, दि. 11- कर्जाची परतफेड करण्याएवढी ऐपत उरली नसल्यामुळे अनेक देशांनी आणि वित्त संस्थांनी पाकिस्तानला कर्ज देणे थांबवले आहे. यात आता पाकिस्तानसाठी सर्वाधिक जवळच्या असलेल्या चीनचाही समावेश झाला आहे. चीनने पाकिस्तानच्या ‘मेनलाइन वन’ या रेल्वे प्रकल्पासाठी 45 हजार कोटी रुपयांचे (सहा अब्ज डॉलर) कर्ज देण्याच्या आधीच्या आश्वासनातून माघार घेतली आहे.
‘मेनलाइन वन’ प्रकल्पांतर्गत पाकिस्तानमधील पेशावर ते कराची दरम्यान रेल्वे जाळे विकसित केले जाणार आहे. यामुळे पाकिस्तानची चार राज्य आधुनिक रेल्वे मार्गाशी जोडली जाणार आहेत. पण पाकिस्तान कर्जाची परतफेड करू शकणार नाही. यामुळे पाकिस्तानला मोठे कर्ज देणार नाही; अशी चीनची भूमिका आहे. कर्जाअभावी पाकिस्तानचा ‘मेनलाइन वन’ हा रेल्वे प्रकल्प ठप्प होण्याची चिन्हे आहेत.
चीनने पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या त्यांच्या सर्व पायाभूत सुविधा निर्मितीच्या प्रकल्पांची आर्थिक समीक्षा सुरू केली आहे. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (सीपीइसी) हा चीनचा पाकिस्तानमध्ये सुरू असलेला एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी तरतूद केलेल्या निधीचीही समीक्षा सुरू करण्यात आली असल्याचे वृत्त आहे.