अरुणाचल प्रदेशात राजनाथ सिंह यांच्या भेटीला चीनचा आक्षेप

बीजिंग :  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अरुणाचल प्रदेशला भेट देण्याला चीनकडून आज आक्षेप घेण्यात आला. चीनकडून कधीही भारताच्या ईशान्येकडील राज्याला मान्यता दिली गेलेली नाही. हा भाग दक्षिण तिबेटचाच भाग असल्याचे चीनने नेहमी म्हटले आहे.

राजनाथ सिंह यांनी गुरुवारी अरुणाचल प्रदेशातील तवांग भागाला भेट दिली. चीनच्या सीमाभागातील नागरिक आणि लष्करातील मैत्रीपूर्ण संबंधांसाठी साजरा होणाऱ्या मैत्री दिवसानिमित्त त्यांनी ही भेट दिली होती. चिनी सरकारने तथाकथित अरुणाचल प्रदेश कधीही मान्य केला नाही, अशा शब्दात चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंज शुआंग यांनी या भेटीबाबत प्रतिक्रिया दिली. आम्ही त्या ठिकाणी भारतीय अधिकारी किंवा नेत्यांद्वारे केलेल्या कामांना ठामपणे विरोध करतो, असे गेंग म्हणाले.

भारतीय बाजूंने चीनच्या भूमिकेचा आदर करावा आणि सीमाभागात काही हालचाली वाढवल्यास या विषयातील गुंतागुंत अधिक वाढेल. या भागातील शांतता आणि सौहार्द अबाधित राखण्याचा प्रयत्न भारताने करावा, असेही गेंग यांनी म्हटले आहे.

भारत आणि चीनदरम्यानच्या 3,488 कि.मी. लांबीच्या नियंत्रण रेषा आहे. दोन्ही देशांदरम्यानचा सीमावाद सोडविण्यासाठी दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत चर्चेच्या 21 फेऱ्या झाल्या आहेत. आपल्या भूमिकेकडे लक्ष वेधण्यासाठी अरुणाचल प्रदेशात भारतीय नेत्यांच्या भेटीवर चीनकडून नियमितपणे आक्षेप घेतला जातो.

Leave A Reply

Your email address will not be published.