बीजिंग – संपूर्ण जगाचे चाक ठप्प करणाऱ्या करोना विषाणूचा ज्या वुहान येथे वर्षभरापूर्वी उगम झाला होता, तेथे करोना लसीचा आपत्कालीन वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. काही महत्वाच्या समूहांचे लसीकरण सुरू करण्यात आले असल्याची माहिती काही अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली.
वुहानच्या पंधरा जिल्ह्यांतील 48 क्लिनिकमध्ये 24 डिसेंबरपासून लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली असून काही गटांतील 18 ते 59 वयोगटातील नागरिकांना लस दिली जात आहे. शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार चार आठवड्यांच्या आत लसीचे दोन डोस दिले जाणार आहेत.
हुबेई प्रातांची राजधानी असलेल्या वुहानमध्ये गेल्या 31 डिसेंबर रोजी करोनाचा पहिला रूग्ण आढळला होता. त्यानंतर 1.1 कोटी लोकसंख्या असलेला संपूर्ण हुबई प्रांत 23 जानेवारी रोजी पूर्णपणे लॉकडाउन करण्यात आला होता.
करोनाची लाट काहीशी नियंत्रणात आल्यानंतर एप्रिल महिन्यात हुबेई आणि वुहान मधील लॉकडाउन शिथिल करण्यात आला होता. हुबेई येथे करोनामुळे 4512 जणांचा मृत्यू झाला असून यात एकट्या वुहानमधील 3869 जणांचा समावेश आहे.