वॉशिंग्टन – करोना विषाणूबाबत चीनने जगाला वेळेत सतर्क केले आणि विषाणूचा जनुकीय संरचनाही तातडीने उपलब्ध करून दिला, अशा शब्दात जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने संपूर्ण जानेवारी महिन्यात चीनचे कौतुक केले जात होते.
मात्र प्रत्यक्षात अनेक देशांमधील प्रयोगशाळांनी या विषाणूच्या जनुकीय संरचना डिकोड केल्यानंतर जवळपास आठवड्याभरानंतर चीनच्या अधिकाऱ्यांकडून ही संरचना जाहीर केली. याशिवाय या विषाणूच्या डिजाईन, चाचणी आणि औषधांच्या संशोधनासाठी आवश्यक असलेली माहितीही चीनकडून दिली गेली नाही.
चीनच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील माहितीवर कठोर नियंत्रण आणि अंतर्गत स्पर्धेला यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर टीका होते आहे. अशी माहिती असोसिएशन प्रेस या वृत्तसंस्थेने काही कागदपत्रे, ईमेल आणि डझनभर मुलाखतीतून पुढे आली आहे.
चीनमधील प्रयोगशाळांनी विषाणूची जनुकीय संरचना 11 जानेवारीला प्रसिद्ध केली. मात्र आरोग्य अधिकाऱ्यांनी जागतिक आरोग्य संघटनेला दोन आठवड्यांपर्यंत आवश्यक असलेला तपशील दिलेला नव्हता. तरीसुद्धा डब्लूएचओकडून उघडपणे चीनचे कौतुकच केले जात होते. या कालावधीत उपचार आणि संशोधनाचा महत्त्वाचा कालावधी वाया गेला होता.
“डब्लूएचओ’ उघडपणे चीनची बाजू घेत असल्याबद्दल अमेरिकेने या संघटनेबरोबरचे संबंध तोडून टाकले आहेत. मात्र चीनने डब्लूएचओला पहिल्यापासून सर्व माहिती दिली आहे, असे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी पहिल्यापासून सांगितले आहे.
“डब्लूएचओ’ने चीनला पाठीशी घातलेले नाही. तर “डब्लूएचओ’लाच अंधारात ठेवले गेले होते, असा निष्कर्श असोसिएशन प्रेसच्या निष्कर्शातून काढला गेला आहे. आता चीनच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनाचे अवमूल्यन न करता आणि आपणच केलेले कौतुक खोटे न ठरू देता चीनकडून खरी माहिती कशी काढून घ्यायची, अशी समस्या “डब्लूएचओ’समोर आहे.