बीजिंग – चीनमध्ये करोनाच्या प्रसाराचा वेग जरी मंदावला असला तरी हा देश अजुनही त्या विषाणूबाबत माहिती देण्यास लपवाछपवी करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री टोनी ब्लिंकन यांनीही काही दिवसांपूर्वीच असाच आरोप केला होता.
करोनासाठी केवळ चीनच जबाबदार असल्याची टीका करताना यासंदर्भात चीन अजुनही पारदर्शक व्यवहार करत नसल्याचे त्यांनी नमूद केले होते.
युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाच्या एका प्राध्यापकाचा हवाला देताना फॉक्स न्यूजने एका बातमीत म्हटले आहे की, या महामारीच्या संख्येच्या संदर्भात चीन अजुनही खोटी माहिती देतो आहे. फॉक्स न्यूजला पाठवण्यात आलेल्या इ मेल मध्ये प्रा. स्टॅनली रोसेन म्हणाले की, केंद्र सरकारला डेटा उपलब्ध करून देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या स्तरावरच आकडेवारीची गडबड होते आहे.
दरम्यान, ही बनवाबनवी सोडली तर करोनाचा प्रसार रोखण्यासाठी मात्र चीनने चांगले काम केले असल्याचे प्रशस्तीपत्रक त्यांनी दिले आहे. चीनच्या राजकारणाचे विशेषज्ञ असलेले रोसेन म्हणाले की त्या देशात एक आणखी वेगळाच प्रयोग केला जातो आहे.
ज्या बाधितांना लक्षणे नाहीत, त्यांची नोंद करोना पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये केली जात नसल्याचे आढळून आले आहे. अर्थात ही संख्या कमी असली तरी आकडेवारी आणि नोंदणीची जेव्हा वेळ येते तेव्हा चीनची वर्तवणूक अगदी बेजबाबदारणाचीच असते.
दरम्यान, वॉशिंग्टन विद्यापीठाचे डॉ. स्टिफन हेवीस यांनीही आरोप केला आहे.चीनने करोना महामारीची माहिती जगापासून लपवून तर ठेवलीच. मात्र स्वत:च्या देशातही याचा प्रसार रोखण्यासाठी योग्य पाउले उचलली नाहीत असा दावा त्यांनी केला आहे. चीनच्या अन्य भागांतही अजुन रूग्ण सापडत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.