न्यूयॉर्क : करोनाशी लढा देण्यासाठी लागणाऱ्या औषधांचा साठा करण्यासाठी चीनने विषाणूची तसेच हा किती धोकादायक आजार आहे याची माहिती लपवल्याचा अमेरिकेतील अधिकाऱ्यांचा आरोप आहे. गुप्तचर विभागाने यासंबंधी एक अहवाल तयार केला आहे.
चीनने जाणुनबुजून करोना महामारी किती गंभीर आजार आहे याची माहिती लपवली असा उल्लेख या अहवालात करण्यात आला आहे. जानेवारीच्या सुरुवातीला करोनाचा फैलाव होण्यास सुरुवात झाल्याचीही अहवालात नोंद आहे. होमलँड सेक्युरिटीने १ मे रोजी हा चार पानांचा अहवाल तयार केला आहे. हा अहवाल असोसिएटेड प्रेसच्या हाती लागला असून त्यांनी हे वृत्त दिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वारंवार चीनवर टीका करत असतानाच हा अहवाल समोर आला आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पिओ यांनी याआधी चीनमुळेच करोनाचा फैलाव झाला असून त्यांनाच जबाबदार ठरवले पाहिजे असे स्पष्टपणे सांगितले होते.
रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, करोनाची गंभीरता लपवताना चीनने औषधांची आयात वाढवली आणि निर्यात कमी केली. तसेच चीनने जवळपास संपूर्ण जानेवारी महिना जागतिक आरोग्य संघटनेला करोना साथीचा आजार असल्याची माहिती न देता लपवून ठेवली, जेणेकरुन इतर देशांमधून वैद्यकीय पुरवठा मागवण्यात येईल. यावेळी फेस मास्क, सर्जिकल गाऊन तसंच ग्लोव्ह्ज यांची आयात वाढली होती. रिपोर्टनपसार, चीनच्या आयात आणि निर्यातीत झालेले बदल हे सामान्य नव्हते हे स्पष्ट दिसत आहे.