वॉशिंग्टन – चीनकडे लष्करी, आर्थिक, राजनैतिक आणि राजकीय विनाशकारी ताकद मोठी आहे. कायद्याने ज्या देशांचा कारभार चालू आहे त्यांच्यात अशांतता निर्माण करण्याचे काम ते या ताकदीवर करू शकतात, पण अमेरिका, आमचे मित्र राष्ट्र आणि आमचे सहकारी देश मिळून आम्ही त्यांचा यशस्वी मुकाबला करू असा विश्वास अमेरिकेचे विदेश मंत्री टोनी ब्लिंकेन यांनी व्यक्त केला आहे. सिनेट समितीपुढे झालेल्या एका सुनावणीच्यावेळी त्यांनी हे प्रतिपादन केले.
ते म्हणाले की, चीनचे अमेरिकेशी सध्या जे संबंध आहेत ते गुंतागुंतीचे आहेत. ते म्हणाले की, चीनकडे सध्या अनेक प्रकारची विनाशकारी ताकद आहे. त्याचा वापर करून ते आमच्यासह अन्य ठिकाणी अशांतता निर्माण करू शकतात, पण आम्ही त्याचा यशस्वीपणे मुकाबला करू शकतो.
अमेरिकेच्या सन 2022 च्या अर्थसंकल्पाच्यानिमीत्ताने विदेश मंत्र्यांची सिनेटपुढे साक्ष झाली त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, अमेरिकेला जगात सगळीकडे मित्र आहेत, पण चीनला मात्र कोणीही मित्र नाही. त्यामुळे अमेरिका आपल्या अन्य मित्र राष्ट्रांशी अधिक जवळीकीने काम करून चीनकडून निर्माण झालेल्या आव्हानाला आम्ही प्रतिआव्हान देऊ असे त्यांनी नमूद केले.
ते म्हणाले की, आम्ही अशिया-पॅसिफिक विभागातील आपली ताकद वाढवत आहोत. आमची 60 टक्के नौदल शक्ती तेथे गुंतली आहे. त्यामुळे आम्ही तेथे अधिक सक्षम बचावाची स्थिती निर्माण केली आहे असेही त्यांनी नमूद केले.
चीनने सध्या आपला अण्विक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर वाढवण्यास प्रारंभ केला आहे, त्यात त्यांनी मोठी गुंतणूक चालवली आहे. त्यांचे हे अण्विक आव्हान मोठे आहे, सध्या आम्ही त्यावर लक्ष केंद्रीत केले आहे असेही ब्लिंकेन यांनी यावेळी सांगितले. आर्थिक ताकदीच्या बाबतीत आम्ही चीनच्या खुप पुढे आहोत. त्यामुळे सध्या तरी चीन आमच्या जवळपासही फिरकू शकत नाही असेही त्यांनी नमूद केले.