बीजिंग – करोना विषाणूच्या उत्पत्तीबाबत वुहान शहरातील वैद्यकीय प्रयोगशाळांची फेरतपासणी करण्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा पर्याय चीनने स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला आहे. विशेषतः वुहानच्या विषाणू प्रयोगशाळेमधून हा विषाणू पसरला असल्याच्या शक्यतेवर चीनने जोरदार आक्षेप घेतला आहे. या प्रयोगशाळेतील काही कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम करोनाची लागण झाली होती. त्यानंतर हा विषाणू वुहान शहरामध्ये आणि जगभर पसरला होता, हा दावाही चीनने फेटाळून लावला आहे.
वुहान शहराची फेरतपासणी करण्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने अलीकडेच पर्याय सुचवला होता. त्याला चीन कधीही परवानगी देणार नाही, असे चीनमधील राष्ट्रीय आरोग्य आयोगाचे उपमंत्री झेन यिक्सिन यांनी प्रसिद्धी माध्यामांना सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेने सुचवलेला हा पर्याय विज्ञानाला धरून नाही. तपासणीच्या दुसऱ्या टप्प्यात वुहानऐवजी जगभरातील अन्य काही देशांचीे तपासणी करण्यात यावी अशी मागणीही यिक्सिन यांनी केली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधनान घेब्रेयसिस यांनी पूर्वी चीनमधील करोनाची साथ आटोक्यात आणण्याबद्दल जिनपिंग यांचे कौतुक केले होते. त्यावरून चीनने त्यांचे कौतुक केले होते. मात्र, आता त्यांनीच वुहानच्या फेरतपासणीचा पर्याय सुचवला आहे. त्यामुळे चीनने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.