चीनने अखेर पहिल्यांदाच केले मान्य; गलवान व्हॅलीतील संघर्षात चार चिनी सैनिकांचा मृत्यू

नवी दिल्ली – मागील वर्षी जून महिन्यात लडाखमधील गलवान खोऱ्यातील संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले होते. यामध्ये चिनी सैनिकांचाही मृत्यू झाल्याचे सांगितले जात होते. परंतु, यावर चीनने कोणतीही भूमिका मांडली नव्हती. मात्र, अखेर आज चीनने गलवान खोऱ्यात चार सैनिकांचा मृत्यू झाल्याचे मान्य केले आहे. या चार सैनिकांना चीनने मरणोत्तर पदक देऊन गौरवल्याने ही माहिती समोर आली आहे.

माहितीनुसार, चीनच्या केंद्रीय लष्करी आयोगाने काराकोरम पर्वतावर कर्तव्यावर असलेल्या आणि जूनमध्ये शहीद झालेल्या चार सैनिकांचा गौरव केला आहे. या चार सैनिकांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर केला आहे.

तर एका वृत्तानुसार गलवान व्हॅलीत पाच सैनिकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. कमांडर क्यूई फबाओ, चेन होंगुन, जियानगॉन्ग, जिओ सियुआन आणि वाँग जुओरन अशी या जवानांची नावे आहे. यातील चौघांचा मृत्यू गलवान व्हॅलीतील संघर्षात झाला होता. तर एकाचा मृत्यू मदत मोहिमेदरम्यान नदीत वाहून गेल्याने झाला होता.

दरम्यान, सर्वत्र करोनाने हाहाकार माजविला असताना पूर्व लडाखमधील गलवान व्हॅलीत भारत व चिनी सैन्यामध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. त्यानंतर दोन्ही देशातील संबंध कमालीचे ताणले गेले होते. यामुळे भारत-चीन सीमेवर युद्धसदृश्य स्थितीही निर्माण झाली होती. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.