नवी दिल्ली – उद्दाम आणि मुजोर चीनचे रोज नवनवीन प्रताप उघड होत आहेत. आता चीनसाठी हेरगिरी करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधानांच्या कार्यालयावरच वॉच ठेवला जात होता, अशी प्राथमिक माहिती या लोकांच्या तपासात निष्पन्न झाली आहे.
राजीव शर्मा, शेर बहादूर आणि क्विंग शी नामक चीनी महिला अशा तिघांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. त्यांची चौकशी सुरू असून त्यांना तिहार तुरूंगात ठेवण्यात आल्याची माहिती आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार पंतप्रधान कार्यालयासह प्रमुख कार्यालयांची माहिती गोळा केली जात होती. त्यात कोणत्या कार्यालयात कोणती व्यक्ती महत्वाची अथवा प्रभावशाली आहे, ते हेरून त्याच्या संदर्भातली माहितीही गोळा करण्याचे कारस्थान सुरू होते.
क्विंग शीच्या चौकशीत कोलकात्यातील एका प्रभावशाली महिलेचे नाव पुढे आले आहे. त्याचप्रमाणे एका धार्मिक स्थळाशी संबंधित एका व्यक्तीची माहितीही पुढे आली आहे. चीनच्या या हेगगिरीच्या रॅकेटला भारतीय मंत्रालयांतील आणि तेथील प्रमुख व्यक्तींची माहिती गोळा करण्यास सांगण्यात आले होते.
कोलकात्यातील ती प्रभावशाली महिला जी माहिती मिळवून देत होती ती चीनला पाठवली जात होती. काही महत्वाचे दस्तावेज अशा प्रकारे चीनच्या भाषेत अनुवादीत करून पाठवले गेल्याचे समजते आहे.
भारताच्या पंतप्रधान कार्यालयासोबतच तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते दलाई लामा यांच्या संदर्भातही माहिती गोळा केली जात होती. क्विंग शी, राजीव शर्मा आणि त्यांचा नेपाळी साथीदार शेर बहादूर यांना महिनाभरापूर्वी अटक करण्यात आली आहे.
भारतात जासूसी करण्याच्या मोबदल्यात क्विंगला महिन्याला एक लाख रूपये दिले जात होते. दक्षिण दिल्लीत एका ठिकाणी ती भाड्याने राहत होती. त्याचे पन्नास हजार रूपये भाडे दिले जात होते. ते कोण देत होते, याचाही तपास आता सुरू आहे.
चीनी नागरिक चाली पेंग उर्फ लुओ सांग याच्या ऑगस्ट महिन्यातील अटकेनंतर हे हेरगिरीचे प्रकरण समोर आले होते. प्राप्तीकर विभागाच्या एका धाडीस हा प्रकार समोर आला होता.
लुओ सांग प्रामुख्याने दलाई लामा यांच्या संदर्भातील घडामोडींवर लक्ष ठेवून होता. लामा यांच्या कोअर टीममध्ये घुसखोरी करण्याचा सांग याचा प्रयत्न होता. माहिती पाठवण्यासाठी ती चीनी ऍप्सचा वापर करत होता. त्यामुळेच भारताने 200 चीनी ऍप्सवर बंदी घालण्याचे पाउल उचलले असे मानले जात आहे.