शिन्जियांग प्रांतात वांशिक हत्याकांडाचा आरोप चीनने फेटाळला

बीजिंग – शिन्जियांग प्रांतातील मुस्लीम आणि उघ्युरांचे वांशिक हत्याकांड घडवून आणल्याचा आरोप चीनने फेटाळून लावला आहे. मुस्लिमांसह उघ्युर अल्पसंख्यांक समाज या प्रांतात आनंदाने रहात असून त्यांना धार्मिक आणि रोजगारासंबंधीचे स्वातंत्र्य असल्याचे चीनने म्हटले आहे. चीनच्या उत्तरेकडील शिन्जियांग प्रांतात लक्षावधी अल्पसंख्यांकांना ताब्यात घेऊन कोठडीमध्ये डांबले गेले असल्याचे काही निरीक्षक आणि संयुक्‍त राष्ट्राने म्हटले आहे. मात्र या कोठड्या नसून व्यवसायिक प्रशिक्षणाची केंद्रे आहेत, असे चीनने म्हटले आहे.

देशातील कट्टरवादाविरोधात लढण्याची गरज असल्याचेही चीनने म्हटले आहे. चीनमध्ये दहशतवाद विरोधी अभियान हे पूर्णपणे कायद्याला अनुसरून राबवले जात आहे. शिन्जियांग प्रांतात स्थैर्य आणि शांतता आहे. या प्रांतात विकासही वेगाने होत आहे. शिन्जियांग प्रांतात 24 हजार मशिदी आहेत. तिथे सर्व वंशाच्या नागरिकांना मजूरीचे अधिकार आहेत. या भागात गेल्या चार वर्षांपासून दहशतवादी प्रकरण उघड आलेले नाही, असे चीनचे परराष्ट्र मंत्री वॅंग वी यांनी संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेला सांगितले. चीनबाबतची ही अतिशयोक्तीपूर्ण माहिती निष्काळजीपणे आणि पूर्वग्रहाने पसरवली जात आहे, असेही वॅंग वी म्हणाले.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शिन्जियांग प्रांतातील वांशिक हत्याकांडाबाबतचा आरोप केला होता. याबद्दल चीनवर अमेरिकेने निर्बंध घालायलाच पाहिजेत, असेही म्हटले होते. तर नवीन अध्यक्ष जो बायडेन यांनीही या म्हणण्याला दुजोरा दिला होता. ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डॉमनिक राब यांनी शिन्जियांग प्रांतात बळजबरीने मजूरी करायला लावणे, नसबंदी करून टाकणे आणि वांशिक हत्याकांडाचा निषेध केला होता. तर जर्मनीचे परराष्ट्र मंत्री हेको मास यांनी जागतिक पातळीवरील बांधिलकीमुळे कोणत्याही प्रकारे मानवताविरोधी कृत्यांना निषेध आणि विरोध केला जाण्याची मागणी केली होती. चीनवर होत असलेल्या या आरोपांची शहानिशा करण्यासाठी संयुक्त राष्ट्राने पडताळणीसाठी पथक पाठवण्याची मागणी वॅंग वी यांनी केली आहे. मात्र या तपासणीसाठी कोणतीही निश्‍चित कालमर्यादा त्यांनी स्पष्ट केलेली नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.