श्वेता शिगवण
पुणे : चीनमध्ये कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला असून यामुळे आतापर्यंत १०६ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे बर्ड फ्लू आणि सार्सने चीनमध्ये माजवलेल्या आठवणींना उजाळा मिळत आहे. कोरोना हा या दोन्ही आजरांपेक्षा अधिक भयावह असल्याचे चित्र समोर येत आहे.
यानंतर कोरोना व्हायरसने आता हळूहळू जगभरात आपले पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. भारत ४, जपान आणि श्रीलंकेत अनुक्रमे एक संशयित रुग्ण सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आपातस्थिती असल्याचे म्हंटले आहे.
चीनच्या इतिहासातही अनेक वेळा अशा खतरनाक विषाणूजन्य व्हायरसने हाहाकार माजवला होता. १९९७ सालीही चीनमध्ये H5N7 हा व्हायरस सापडला होता. याला बर्ड फ्लूही म्हंटले गेले होते. यामुळे चीनमध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर शेकडो अंडी आणि कोंबड्यांना मारण्याचे आदेश देण्यात आले होते. २०२०-०३ साली सार्स नावाचा भयानक रोग चीनमध्ये पसरला होता. यामुळे चीनमध्ये २६७ जणांचा मृत्यू झाला होता. तर संपूर्ण जगभरात ७७४ जणांचा मृत्यू झाला होता.
इबोला व्हायरसनेही जगाला धास्ती घातली होती. याचा सर्वात जास्त प्रादुर्भाव पश्चिम आफ्रिकेत झाला. २०१३ साली २८ हजार ६१६ जणांना इबोलाची लागण झाली होती तर यामुळे ११ हजार ३१० जणांचा मृत्यू झाला होता.
सध्या चीनमध्ये नॉव्हेल कोरोनाव्हायरसचा प्रार्दुभाव आढळला आहे. ताप हे याचे प्रमुख लक्षण असून काही रुग्णांमध्ये श्वसनाचा त्रासही आढळतो. या आजाराचा प्रसार कोणत्या मार्गाने होतो हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र मानवी संपर्कातून या रोगाचा संसर्ग झाल्याचा ठोस पुरावा नाही. जागतिक आरोग्य संघटनेने या रोगाचा जागतिक प्रसार होण्याचा धोका कमी असल्याचे सांगितले असले तरीही खबरदारीचा उपाय म्हणून चीनला जाणाऱ्या प्रवाशांसाठी सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
काय आहे कोरोना व्हायरस
या विषाणूची लागण डिसेंबर महिन्यात चीनमधील वुहान शहरातून पसरली असल्याचा संशय आहे. साध्या सर्दी खोकल्यापासून ते मर्स किंवा सार्स यासारख्या गंभीर आजारास कारणीभूत असणाऱ्या एका विशिष्ट प्रकारच्या विषाणू गटाला ‘करोना’ म्हणतात. हा नवा विषाणू “एनसीओवी’ (novel corona virus 2019 (nCov) असल्याचे सिद्ध झाले आहे. सन २००३मध्ये आढळलेला (सार्स) हा देखील एक प्रकारचा “करोना’च होता. यामुळे २००३ साली ७७४ लोकांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने मुंबई, दिल्ली व कोलकाता येथील आंतरराष्ट्रीय विमानतळांवर बाधित देशांतून येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रीनिंग सुरू केले आहे. अशा प्रवाशांतून आढळलेल्या संशयित रुग्णांचा व त्यांच्या निकट सहवासितांचा पाठपुरावा व आवश्यक कार्यवाही एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमामार्फत करण्यात येणार आहे. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थान (एनआयव्ही) येथे या आजाराच्या निदानाची सुविधा उपलब्ध आहे. भारतात केंद्रसरकारने कोरोना विषाणू संदर्भात माहिती देण्यासाइ 24 तास काम करणारी हेल्पलाईन सुरू केली असून, 91-11- 23978046 या क्रमांकावरुन ही माहिती मिळवता येईल.