बीजिंग- चीनने त्यांच्या देशातील अमेरिकन पत्रकारांचे ऍक्रिडेशनचे रिन्युअल करण्यास चालढकल चालवली असून चीनमधील अमेरिकन पत्रकारांच्या हकालपट्टीचा विचार त्या सरकारकडून सुरू असल्याचे वृत्त आहे. अमेरिकेने त्यांच्या देशात काम करणाऱ्या चिनी पत्रकारांची हकालपट्टी केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून चीन ही कृती करण्याच्या विचारात आहे.
अमेरिकेतील विविध वृत्तसंस्थांनी आमच्या चीनमधील वार्ताहरांच्या ऍक्रिडेशनवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध घातले जात आहे किंवा त्यांची अधिस्वीकृतीचे नूतनीकरण लांबवण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप केला आहे. सीएनएनने म्हटले आहे की आमच्या चीनमधील वार्ताहराला एक वर्षाचे नूतनीकरण देण्याऐवजी दोन महिन्याचे नूतनीकरण विलंबाने जारी करण्यात आले आहे.
चीनमधील विदेशी पत्रकारांच्या क्लबने म्हटले आहे की, वॉल स्ट्रीट जनरल आणि ब्लुमबर्ग या संस्थांच्या प्रतिनिधींनाही अशाच स्थितीला तोंड द्यावे लागले आहे. याखेरीजही अन्य विदेशी विशेषत: अमेरिकन पत्रकारांना चीनकडून अशाच स्वरूपाच्या कारवाईला भविष्यात तोंड द्यावे लागण्याची भीती वाटते आहे. या कारवाई मागे अन्य कोणतेही कारण नसून केवळ अमेरिकेने चिनी पत्रकारांवर केलेल्या कारवाईला प्रत्युत्तर देणे एवढाच भाग आहे, असेही सांगितले जात आहे.
अमेरिकेत काम करणारे काही चिनी पत्रकार त्यांच्या लष्करासाठी काम करीत होत,े असे तपासात निष्पन्न झाल्याने अमेरिकेने काही चिनी पत्रकारांची हकालपट्टी केली होती. या प्रकरणाची त्याला पार्श्वभूमी आहे.