ब्रिक्‍स परिषदेसाठी चीनचा भारताला पाठिंबा

बीजिंग – यंदाच्या ब्रिक्‍स परिषदेचे आयोजन करण्यासाठी चीनने सोमवारी भारताला पाठिंबा दिला. उदयोन्मुख अर्थकारण असलेल्या 5 सदस्यांच्या गटातील सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी भारताबरोबर काम करण्याची तयारीही चीनने दर्शवली आहे.

ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांचा सहभाग असलेल्या “ब्रिक्‍स’देशांच्या परिषदेचे अध्यक्षपद 2021 या वर्षासाठी भारताकडे आहे. त्यामुळे यंदा ही परिषद भारतात आयोजित केली जाणार आहे. या दृष्टीने परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी 19 फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीत सुषमा स्वराज भवनामध्ये आयोजित कार्यक्रमात “ब्रिक्‍स 2021′ या संकेतस्थळाचे उद्‌घाटन केले आहे.

“ब्रिक्‍स’शिखर परिषद आयोजित करण्यात चीन भारताला पाठिंबा देत आहे. असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वॅंग वेनबिन यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. ब्रिक्‍स ही उदयोन्मुख अर्थव्यवस्था आणि विकसनशील देशांचा समावेश असलेल्या जागतिक प्रभाव असलेली एक सहकार्य यंत्रणा आहे. अलिकडील काही वर्षांमध्ये “ब्रिक्‍स’मध्ये व्यापक ऐक्‍य आणि खोलवर रुजलेली व्यवहारिक सहकार्यासह प्रभावी कार्यपद्धती वाढीस लागली आहे, असेही वॅंग यांनी सांगितले.

“ब्रिक्‍स’ गट आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठीचा सकारात्मक, स्थिर आणि विधायक गट असल्याने त्याचे महत्व अधिक आहे. एकता आणि सहकार्याची एकत्रित वाढ करण्यासाठी आम्ही त्यातील भागीदारी अधिक मजबूत करण्यास वचनबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

यंदाच्या “ब्रिक्‍स’ परिषदेला चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे उपस्थित राहणार की नाही, याबाबत वॅंग यांनी कोणतीही माहिती दिली नाही. यापूर्वी झालेल्या ‘ब्रिक्‍स’च्या सर्व परिषदांना जिनपिंग उपस्थित राहिले होते. पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन दोन्ही देशांनी सैन्य माघारी घेण्याच्या मुद्दयावर एकमत केल्यानंतर भारतात होणाऱ्या “ब्रिक्‍स’ परिषदेला जिनपिंग उपस्थित राहणार की नाही, याबाबत औत्स्युक्‍य आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.