बिजींग – चीनने आपल्या देशातील नागरीकांसाठी केवळ दोनच अपत्य असण्याचे निर्बंध घातले होते. पण गेल्या अनेक वर्षात त्याचे मोठे सामाजिक दुष्परिणाम दिसून आल्यानंतर आता चीन सरकारने आपल्या लोकसंख्या धोरणात बदल केला असून आता त्या देशातील नागरीकांना तीन अपत्त्ये असण्यास अनुमती दिली आहे.
चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने सरकारला तशी शिफारस केली होती ती आता मान्य करण्यात आली आहे. नॅशनल पीपल्स कॉंग्रेसच्या स्थायी समितीत ही शिफारस मान्य करण्यात आली आहे.
जादा अपत्ये असणे ही परवडणारी बाब नाही त्यामुळे चिनी नागरीकांनी या नव्या धोरणाविषयी चिंता व्यक्त केली होती. त्यांच्या चिंतेचेही निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार असून या बाबतीत संबंधीत कुटुंबाला सामाजिक आणि आर्थिक मदतही दिली जाणार आहे. अशा जादा अपत्य असलेल्या कुटुंबाला कर सवलती, विमा, शिक्षण, घरे आणि रोजगाराच्या बाबतीतही मदत दिली जाणार आहे.
चीन मध्ये सुरूवातीला एकच अपत्याचे बंधन घालण्यात आले होते. ते तीन दशके अंमलात होते. त्यामुळे किमान चारशे दक्षलक्ष जीव जन्माला येण्यापासून वाचले होते. तथापि या निर्णयामुळे चीनच्या लोकसंख्या वाढीवर कमालीचे निर्बंध आले आणि ही लोकसंख्या वाढ घसरणीला लागली होती. तसेच देशातील वृद्धांच्या संख्येतही कमालीची वाढ झाली होती.