पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ वक्तव्याचे चीनने केले कौतुक, मतभेद दूर करण्यासाठी चर्चेला प्राधान्य

बीजिंग – अमेरिकेतील पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन यांनी घेतलेल्या मुलाखतीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी चीन संदर्भात बोलताना चर्चेने मतभेद दूर केले जाऊ शकतील, असे मत व्यक्त केले होते. त्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी कौतुक केले आहे. परस्पर यशात योगदान देणारे हत्ती आणि ड्रॅगन यांच्यातील सहकार्य हा दोन्ही बाजूंसाठी एकमेव पर्याय आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये रशियातल्या कझान शहरात भेट झाली होती. ही भेट विकास आणि द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या दृष्टीने धोरणात्मक मार्गदर्शक ठरली. दोन्ही बाजूंनी महत्वाच्या समान सामंजस्याचा मनापासून पाठपुरावा केला. आदान प्रदान सक्षम केले आणि सकारात्मक निष्पत्ती साध्य केली, असेही त्या म्हणाल्या,
यापुर्वीच्या २ हजार वर्षांच्या संवादाच्या इतिहासामध्ये दोन्ही देशांनी मैत्रीपुर्ण संवाद कायम ठेवला. सांस्कृतिक उपलब्धी आणि मानवी उत्क्रांतीमध्ये एकमेकांनी दिलेल्या योगदानातून दोन्ही देश शिकले आहेत. आपल्या विकासाला गती देणे हे दोन्ही देशांसमोर समान उद्दिष्ट आहे. त्यासाठी दोन्ही देशांनी समंजसपणे एकमेकांच्या यशात आधार आवश्यक आहे, यातूनच २.८ अब्ज जनतेचे हित साध्य केले जाऊ शकेल. यातूनच प्रदेशातील समान आकांक्षा पुर्ण केल्या जाऊ शकतील. यातूनच ग्लोबल साऊथ सक्षम आणि जागतिक शांततेला अनुकूल केले जाऊ शकेल, असेही त्या म्हणाल्या.
दोन्ही देशांनी एकमेकांच्या यशामध्ये योगदान देणारे भागीदार व्हायला हवे. दोन्ही देशांसाठी हाच एकमेव योग्य पर्याय असल्याचेही निंग यांनी जोर देऊन सांगितले. ;नचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी द्विपक्षीय संबंधांच्या विकासासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा त्यांनी पुनरुच्चारही केला.
दोन्ही देशांच्या नेत्यांमधील महत्वपूर्ण समान सामंजस्याची अंमलबजावणी करण्यासाठी चीन भारताबरोबर काम करण्यास तयार आहे. स्थिर आणि समर्थ विकासाच्या दृष्टीने द्विपक्षीय संबंधांतल्या प्रगतीसाठी दोन्ही देशांमधील उच्चस्तरिय संबंध प्रस्थापित झाल्याला ७५ वर्षे पुर्ण होण्याचे निमित्त ही एक योग्य संधी आहे, असेही त्या म्हणाल्या.
काय म्हणाले होते मोदी?
भारत आणि चीनच्या सुरक्षा दलांमध्ये २०२० मध्ये पूर्व लडाखमध्ये झालेल्या संघर्षानंतर निर्माण झालेला तणाव दूर करण्याच्या उद्देशाने शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर दोन्ही देशांमधील संबंध सामान्य होत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. दोन शेजारी देशांमध्ये मतभेद असणे स्वाभाविक आहे. मात्र दोन्ही देश एकमेकांच्या पुरातन संस्कृतीतून बरेच शिकले असून फार थोडे मतभेद आहेत. मतभेदांचे रुपांतर संघर्षात होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी चर्चेला प्राधान्य दिले जात असल्याचेही पॉडकास्टवरील मुलाखतीमध्ये चीनसंदर्भात बोलताना मोदी म्हणाले होते.





