बीजिंग: अमेरिकेने चीनच्या काही अधिकाऱ्यांच्या गटावर व्हिसा निर्बंध घातल्यानंतर चीननेही “जशास तसे’ शैलीने अमेरिकेला उत्तर दिले आहे. अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाच्या तीन वरिष्ठ खासदारांवर चीनने व्हिसा निर्बंध घातले आहेत.
त्यामुळे चीनमधील शिन्झियांग प्रांताच्या पश्चिमेकडील प्रांतात उघ्युर मुस्लिमांबाबत चीनकडून दिली जात असलेल्या भूमिकेवरून निर्माण झालेले वादंग अधिक चिघळण्याची शक्यता आहे. चीनवर अतिशय कठोर भाषेत टीका करणारे सिनेटर मॅक्रो रुबिओ आणि टेड क्रूझ यांच्यासमवेत कॉंग्रेसचे सदस्य ख्रिस स्मिथ यांच्यावर हे निर्बंध घालण्यात आले आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यासाठीचे अमेरिकेचे राजदूत सॅम ब्राउनबॅक यांच्यावरही निर्बंध घालण्यात आलेले आहेत.
शिन्झियांग प्रांतातील धार्मिक स्वातंत्र्याच्या मुद्दयावरून अमेरिकेने चीनच्या काही अधिकाऱ्यांवर व्हिसा बंदी घातली आणि त्यांची अमेरिकेतील मालमत्ताही गोठवली होती. त्यामध्ये शिन्झियांग प्रांतातील कम्युनिस्ट पार्टीचे प्रमुख चेन क्वांगओ यांचाही समावेश आहे. अमेरिकेच्या या चुकीच्या कृत्याला उत्तर म्हणून चीनने हे प्रत्युत्तर दिल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी सांगितले.
अमेरिकेने तातडीने आपल्या व्हिसा निर्बंधांना मागे घ्यावे. चीनच्या अंतर्गत कारभारामध्ये हस्तक्षेप करणे थांबवावे आणि चीनच्या हेतूला बाधा पोहोचेल, असे काही करू नये असेही त्या म्हणाल्या. अमेरिकेला अधिक कठोर प्रत्युत्तरही दिले जाऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.