बीजिंग – “जी-20′ गटाच्या बैठकीपूर्वी चीनने अमेरिका आणि नाटोवर कडवट शब्दात टीका केली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ऍन्टनी ब्लिंकेन आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वॅंग यी यांच्यातील बैठकीपूर्वी हे टीकास्त्र सोडण्यात आले आहे. चीनचे परराष्ट्र प्रवक्ते झॅंग झियांग यांनी केलेल्या या टीकेमुळे दोन्ही देशांमधील बिघडलेले संबंध पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत.
इतर देशांबरोबर चीनचे संबंध बिघडलेले आहेत, अशी टीका गेल्या आठवड्यात स्पेनमध्ये झालेल्या नाटोच्या बैठकीत करण्यात आली होती. ब्लिंकन यांनी या बैठकीमध्ये चीन आंतरराष्ट्रीय नियमांची पायमल्ली करत असल्याचा आरोप केला होता. त्याला झॅंग झियांग यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
नियमांवर आधारीत आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणजे प्रत्यक्षात एक कुटुंबच असते. मात्र त्यातील नियम काही निवडक देशांनी मिळून अमेरिकाच्या हितरक्षणासाठीच ठरवलेले आहेत. अमेरिका केवळ त्यांना योग्य वाटतील तेच आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करत असते, असे झियांग म्हणाले. केवळ लष्करी सामर्थ्याच्या जोरावरील आंधळा विश्वास नाटोने सोडून दिला पाहिजे, असेही ते म्हणाले.
अमेरिका आणि चीनदरम्यानचे संबंध व्यापार, दक्षिण चीन समुद्रावरील चीनचा दावा आणि तैवानमधील मानवी हक्कांच्या मुद्यावरून ताणले गेले आहेत. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याची निंदा करण्यासही चीनने नकार दिला आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने रशियावर घातलेल्या निर्बंधांवर चीनने टीका केली आहे.