ढाका- अमेरिकेबरोबर सध्या सुरू असलेल्या व्यापार युद्धाच्या पार्श्वभुमीवर चीनने नेपाळपाठोपाठ बांगलादेशातही आपला जम बसवला आहे. अमेरिकेबरोबरच्या व्यापारी युद्धामुळे अमेरिका बांगलादेशात वाढत्या निर्यात प्रक्रिया झोनमध्ये आपल्या कंपन्यांचे स्थलांतर करून थेट परदेशी गुंतवणूकीत चीनकडून वाढ केली जाईल, असे एका वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. “चायना बेल्ट रोड इनिशिएटिव्ह’चा सदस्य असलेल्या बांगलादेशसाठी ही गुंतवणूक म्हणजे वाढत्या व्यापार युद्धाच्या काळात एक वरदानच ठरेल.
युआन चलनाचे अवमूल्यन रोखण्यासाठी चिनी धोरणकर्त्यांकडून भांडवलाच्या स्रोतावर नियंत्रण ठेवले जात आहे. पण बांगलादेशमधील विविध प्रकल्पांमध्ये चीनची गुंतवणूक गेल्या काही काळात वाढलेली आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी 2016 मध्ये ढाक्याला भेट दिली होती. त्यानंतर 2017-18 मध्ये बांगलादेशातील चीनची थेट परदेशी गुंतवणूक 506 दशलक्ष डॉलरपर्यंत वाढली होती. त्यापूर्वी 2016-17 मध्ये ही थेट परदेशी गुंतवणूक केवळ 68.5 दशलक्ष डॉलर इतकी नगण्य होती. व्यापारी युद्धामुळे आणखी 400 दशलक्ष डॉलरची निर्यात बांगलादेशला होऊ शकते, असेही या वृत्तात म्हटले आहे. त्यासाठी आशिया विकास बॅंकेचे मुख्य अर्थतज्ञ यासुकी स्वादा यांच्या वक्तव्याचा दाखलाही दिला गेला आहे.
वस्त्रोद्योगामध्ये चीननंतर बांगलादेशचा क्रमांक लागतो. चीन आणि अमेरिकेतील व्यापारी युद्धामुळे या वस्त्रोद्योगामध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळते आहे. अमेरिकेतील किरकोळ व्यवसायिकांकडून आता बांगलादेशला अधिक कामाच्या ऑर्डर दिल्या जाऊ लागल्या आहेत. अर्थात त्याचा लाभ बांगलादेशला होतो आहे.