महाळुंगे इंगळे – दोन चिमुकल्या मुलींना झोपण्यासाठी घेऊन जात असताना रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नातझालेल्या अपघातात तीन वर्षांची चिमुकली जागीच ठार झाली. तर तिचे वडील व एक लहान बहीण गंभीर जखमी झाले आहेत.
ही घटना चाकण – तळेगाव दाभाडे रस्त्यावरील चाकण गावच्या हद्दीतील राणूबाई मळा (ता. खेड) येथे गुरुवारी (दि. 16) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. भरधाव अज्ञात दुचाकीची जोराची धडक बसल्याने हा अपघात झाला. अपघाता नंतर संबंधित वाहन चालक घटनास्थळी न थांबता वाहनासह फरार झाल्याने त्याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फुलबाई विनोद पुंवार (वय 3 वर्षे, रा. राणूबाईमळा, चाकण) असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुकलीचे नाव आहे. तर तिचे वडील विनोद रामकरण पुंवार (वय 27) व बहीण खुशी विनोद पुंवार (वय 5 वर्षे) अशी जखमी झालेल्या बाप-लेकींची नावे आहेत.
विनोद पुंवार यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. विनोद पुंवार हे निघोजे रस्त्यावरील आरोग्यम हॉस्पिटल लगत राणूबाई मळा येथे आपल्या कुटुंबीयांसमवेत राहत आहेत. गुरुवारी (दि. 16) रात्री साडेदहाच्या सुमारास ते त्यांची मुलगी फुलबाई व खुशी या दोघींना बरोबर घेऊन लगतच्या सारा आर्चिडमध्ये झोपण्यासाठी घेऊन जात असताना ते सर्वजण रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात होते.
त्यावेळी चाकण बाजूकडे भरधाव निघालेल्या अज्ञात दुचाकीची त्यांना जोराची धडक बसली. यावेळी झालेल्या अपघातात फुलबाईचा मृत्यू झाला. तर या अपघातात जखमी झालेले विनोद व ख़ुशी यांना अधिक उपचारासाठी येथील एका दवाखान्यात दाखल करण्यात
आले आहे.