चिंबळी- चिंबळी (ता.खेड ) ग्रामपंचायतीचा प्रभाग रचना व प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर करण्याकरिता शुक्रवारी (दि.17) रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत निवडणूक अधिकारी एस. बी. कारंडे, तलाठी बी. बी. पाटील, ग्रामसेवक पी. व्ही. ढवळे, सरपंच रेश्मा सोनवणे, पोलीस पाटील मयुरी बनकर यांचा उपस्थितीत वार्ड रचनेचा प्रशासनाने बनविलेला नकाशा दाखविण्यात आला.
तलाठी पाटील यांनी प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यास सुरुवात केली. यावेळी बाजार समिती सभापती विलास कातोरे, माजी सरपंच शंकर जैद, विजय जगनाडे, माजी उपसरपंच हेमंत जैद, माजी सदस्य शंकर जैद, ज्ञानेश्वर कड, अनुराग जैद, बाळासाहेब जाधव, लक्ष्मण कातोरे, हिरामण जैद, अर्जुन कातोरे, गुरुदास उंबरकर, अमोल बहिरट व इतर नागरिक, ग्रामस्थ उपस्थित होते.
विशेष ग्रामसभेत जाहीर करण्यात आलेली प्रभाग आरक्षणे : प्रभाग एक :- 1) ओबीसी वर्ग महिला 2) सर्वसाधारण वर्ग महिला जागा, प्रभाग दोन :- 1) ओबीसी वर्ग पुरुष 2) सर्वसाधारण वर्ग महिला 3) सर्वसाधारण वर्ग पुरुष जागा, प्रभाग तीन :- 1) ओबीसी वर्ग पुरुष 2) सर्वसाधारण वर्ग महिला जागा, प्रभाग चार :- 1) मागासवर्ग पुरुष 2) सर्वसाधारण वर्ग पुरुष 3) सर्वसाधारण वर्ग महिला जागा. प्रभाग पाच :- 1) ओबीसी वर्ग महिला 2) सर्वसाधारण वर्ग पुरुष 3) सर्वसाधारण वर्ग महिला
जागा.
काही ग्रामस्थांचा बहिष्कार
ग्रामसभेमध्ये मनमानी पद्धतीने राबविण्यात येणारी आरक्षण सोडत व तयार करून आणलेला वार्डरचना नकाशा मान्य नसून ग्रामस्थांना सहभागी करून वार्डरचना करण्यात यावी. तद्नंतर आरक्षण सोडत द्यावी, असे म्हणत सभा तहकूब करण्याची मागणी काही ग्रामस्थांनी केली.
मात्र, सभा चालूच राहिल्याने जवळपास चाळीस नागरिकांसह सरपंच रेश्मा सोनवणे, माजी उपसरपंच विश्वास बर्गे, शिवाजी कड, पवन पाटारे, ग्रामपंचायत सदस्य गणेश जाधव, समीर जैद, काळूराम बनकर, पंडित जाधव, लक्ष्मण सोनवणे यांनी बहिष्कार टाकत सभेतून काढता पाय घेतला.