चिलीच्या वायुदलाचे विमान 38 प्रवाशांसह बेपत्ता

सॅन्टिगो, (चिली)  : चिलीच्या वायुदलाचे एक विमान काल पासून बेपत्ता असून या विमानामध्ये 38 प्रवासी आहेत. चिलीच्या दक्षिणेला असलेल्या अंटार्टिका तळावरून या विमानाने काल रात्री उड्डाण केले होते, तेव्हापासून ते बेपत्ता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

सैन्याने यापूर्वी सतर्कतेची घोषणा केली होती. तसेच बेपत्ता झालेल्या विमानासाठी शोध आणि बचाव पथक सक्रिय केले होते. बेपत्ता झालेल्या “सी -130 हरक्‍यूलिस’ या विमानामध्ये तीन सामान्य नागरिकांसह 17 कर्मचारी आणि 21 प्रवासी होते.

हे कर्मचारी चिलीच्या तळावर इंधन पुरवठा पाईपलाईन आणि इतर उपकरणांची तपासणी करणार होते. या विमानाचा वैमानिक प्रशिक्षित आणि अनुभवी होता. त्यामुळे विमान सोमवार रात्रीपर्यंत परतणे अपेक्षित होते, असे हवाई दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

संरक्षण व गृहमंत्री यांच्यासमवेत हवाई संरक्षण दलाच्या मुख्यालयातील घडामोडींवर देखरेख करत असल्याचे अध्यक्ष सेबास्टिन पायरा यांनी ट्‌विटरद्वारे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.