पुणे – रेल्वे स्थानकावर विविध कारणांनी एकटी दाखल होणारी लहान मुले अनेकदा भांबावलेली आणि दिशाहीन असतात. या मुलांना योग्य मार्गदर्शन आणि सल्ल्याची गरज महत्त्वाची असते. ही गरज लक्षात घेत, आता पुणे रेल्वे स्थानकात मुलांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. यासाठी स्थानकाच्या आवारात “बालस्नेही कक्ष’ देखील कार्यान्वित करण्यात येणार आहे.
शहर आणि पैशांचे आकर्षणामुळे राज्यासह परराज्यांतून मोठ्या प्रमाणावर मुले येत असतात. याशिवाय तस्करीच्या घटनांमध्ये “रेस्क्यू’ केलेली, भिक्षेकरी मुलांचे रेल्वे स्थानकावर वावरण्याचे प्रमाण मोठे आहे. मात्र या मुलांना अपेक्षित असणारी मदत मिळत नसल्याने ही मुले गैरमार्गाला लागण्याची शक्यता अधिक असते.
तर अनेकदा “रेस्क्यू’ केल्यानंतर मुले घाबरलेली असतात, त्यांना समुपदेशनाबरोबर वैद्यकीय मदत, अन्न आदीची आवश्यकता असते. ही मदत मुलांना करत त्यांच्यासाठी “सुरक्षित’ वातावरणाच्या अनुषंगाने पुणे रेल्वे स्थानकात रेल्वे आणि “होप फॉर दी चिल्ड्रेन फाऊंडेशन’च्या वतीने बालस्नेही कक्ष सुरू करण्यात येणार आहे.