नाणे मावळ : मावळ तालुक्यात शहरी तसेच ग्रामीण भागात पूर्वी मैदानी खेळांना सर्वाधिक महत्त्व दिले जात होते. घरातील पालक, वयोवृद्ध व्यक्ती मुलांना मैदानी खेळात मार्गदर्शन करायचे. तसेच शाळेतील शिक्षकही विद्यार्थ्यांना खेळण्याकरिता प्रोत्साहित करीत होते. सध्या शहर असो की ग्रामीण भाग, लहान मुले पारंपरिक खेळ विसरली असून सतत टीव्ही, मोबाईलवर रमलेली पाहायला मिळत आहे.
पूर्वीच्या काळात कबड्डी, खो खो, कुस्ती, विटी-दांडू, भोवरा यांसारख्या खेळांत मुले रमलेली दिसायची. मातीतले खेळ शरीराला ऊर्जा प्रदान करतात. कबड्डी, कुस्ती व खो-खो या खेळांमध्ये घरातील मुलगा पारंगत व्हावा, यासाठी वडीलधारी मंडळी मार्गदर्शन करायची. कधी स्वतः मैदानावर नेऊन त्यांच्याकडून खेळाचा सराव करून घेत होती. परंतु हल्ली हे चित्र दिसत नाही.
मोबाईलवर तासन तास वेळ घालविण्यात मुले मग्न होऊ लागल्याने खेळाची मैदाने ओस पडू लागली आहेत. अभ्यासाच्या ओझ्याखाली मैदानी खेळ लुप्त झाले आहेत. ग्रामीण भागात पूर्वी उंच झाडावर चढून खाली उड्या मारणे, झाडाच्या फांदीला अडकून कसरत करणे, नदीकाठावरील खडकावरून अथांग पाण्यात उडी घेत मनसोक्त जलक्रीडा करणे, शेतातल्या विहिरीत पोहण्याचा आनंद घेणे, हा बाळगोपाळांचा आवडता खेळ होता. आता मात्र अभ्यासाच्या ओझ्याखाली आणि मोबाइलच्या नादात हे खेळ खेळणे मुलांकडून होत नाही.
मैदानी खेळासाठी पालक असे आग्रही
मुलांनी मैदानी खेळ खेळावे यासाठी पूर्वी पालकच आग्रही असायचे. खेळ खेळणाऱ्या मुलांच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले जात होते. वडीलधारी मंडळी मुलांना शरीर जोपासण्यासाठी कोल्हापूर तसेच पुणे येथील तालमीत पाठवित होते. तसेच वेगवेगळ्या खेळात रुची ठेवणाऱ्या मुलांना शाळेच्या माध्यमातून स्पर्धांमध्ये उतरविण्यात येत होते. स्पर्धा जिंकावी याकरिता शिक्षकही मनापासून मार्गदर्शन करायचे.
पुस्तक वाचनाकडे कानाडोळा
बदलत्या काळानुसार शिक्षणपद्धतीत बदल झाल्याचे दिसते. सोबत मराठी शिक्षणाऐवजी इंग्रजी शिक्षणाला अनाकारण महत्त्व मिळाल्याचे दिसते. पुस्तके वाचून प्रश्नांची उत्तरे शोधणारे विद्यार्थी आता मोबाइलवर प्रश्नांची उत्तरे शोधून अभ्यास करीत आहेत. पुस्तकांचे वाचन करण्याऐवजी मोबाइलवर वेळ घालविणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पुस्तक वाचनाकडे कानाडोळा होत आहे.